चोपडा प्रतिनिधी । येथील श्री फुलमाळी समाज सुधारणा पंच मंडळ तसेच सर्व समाज बांधव यांच्यामार्फत सालाबादप्रमाणे श्री संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी मोठ्या उत्साहात नुकतीच साजरी करण्यात आली. शेवटच्या दिवशी भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली.
याबाबत माहिती अशी की, श्री संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथीनिमित्ताने महाराष्ट्राचे आराध्य दैवत, जगतगुरु आदयसंत श्री संत शिरोमणी सावता महाराज याच्या ७२४ व्या पुण्यतिथिनिमीत्ताने टाळ, मृदंगांच्या जयघोषात समाज बांधवांची उपस्थितीत विनम्र अभिवादन करण्यात आले. या 5 दिवसात हरिनाम कीर्तन सप्ताह दि. २७ जुलै ते ३१ जुलै या कालावधीत घेण्यात आला. दि ३१ जुलै रोजी सकाळी ८ वाजता काल्याचे कीर्तन ह.भ.प. जितेंद्र महाराज (म्हसावद) यांचे कीर्तन करण्यात आले असून दुपारी ११ ते २ वाजेपर्यंत समाजाकडून महाप्रसाद आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादाचा 7 ते 8 हजार भाविकांनी लाभ घेतला आहे. संध्याकाळी ५ ते १० वाजेपर्यंत शहरात भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. ट्रॅक्टरवर श्री संत शिरोमणी सावता महाराजाची प्रतिमा ठेवून, ट्रॅक्टरला सजविण्यात आले. तसेच 2 बँड पथक, समाजातील मुलींनी फेटे, महिलावर्ग केशरी साडी घालून समाजबांधव सह इतर समाजातील लोक मोठ्या प्रमाणावर हजर होते.
संत शिरोमणी सावता महाराजाचा जय घोष देत भजनी मंडळाकडून भजन म्हणत ही मिरवणूक मोठा माळी मंगल कार्यालयातुन रथ गल्ली, बाजारपेठ, मेन रोड, गांधी चौक, कृष्ण मंदिर, थाळनेर दरवाजा, चिंच चौक, ते परत मंगल कार्यालयात पालखीचे समारोप करण्यात आले. 5 दिवसाच्या विविध कार्यक्रमासाठी अध्यक्ष- नारायण महाजन, उपाध्यक्ष- पुंडलिक महाजन, सचिव- सी.बी. माळी, खजिनदार- दगडू माळी, पंच- शिवाजी महाजन, खंडू महाजन, लक्ष्मण माळी, दशरथ महाजन, दिपक महाजन, रमेश महाजन, योगराज महाजन, प्रदीप महाजन, सुरेश महाजन, मोतीलाल माळी, ज्ञानेश्वर पाटील, सेवक- हिम्मत महाजन आदींसह सर्व समाज बांधवांनी मदत केली.