अभियांत्रिकी महाविद्यालय निवडतांना अभ्यासपूर्वक निवडा – डॉ. भंगाळे

df658cfc 237e 447e 981a 60c2fbe273ec

भुसावळ (प्रतिनिधी) अभियांत्रिकी महाविद्यालय निवडतांना त्या महाविद्यालयाला प्रत्यक्षात भेटी देऊन तेथील नॅक मूल्यांकन, एनबीए मूल्यांकन, प्रयोगशाळा, लॅबोरेटरी, वर्कशॉप, इक्विपमेंट, तज्ज्ञ फॅकल्टी, कॅम्पस प्लेसमेंट, सामंजस्य करार, कॉलेजचा मागील वर्षातील रिझल्ट यशिवाय तेथील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृती, आधुनिक सुविधा यांचा सखोल अभ्यास करून योग्य त्या कॉलेजची निवड करावी असे समुपदेश केंद्रप्रमुख डॉ. पंकज भंगाळे यांनी येथील हिंदी सेवा मंडळ संचलित श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे गांधी पुतळा भागातील समुपदेशन केंद्रात प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेसंबंधी मार्गदर्शन करताना सांगितले.

 

विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनविणे, स्वयंरोजगाराकडे वळविणे आणि व्यावहारिक जीवनात यशस्वी होण्यासाठी अभियांत्रिकी शिक्षण फार महत्त्वाचे आहे. अभियांत्रिकी शिक्षण हे मनुष्यबळ विकासाचे साधन म्हणून फार उपयुक्त आहे. तसेच तंत्र शिक्षणातील भारतातील विशेषत: महाराष्ट्रातील सद्यस्थिती व्यवस्था आणि प्रणाली व प्रशिक्षण आदी बाबतची माहिती असणे गरजेचे आहे. तसेच अभियांत्रिकी शिक्षणासंबंधीची धोरणे, योजना आणि कार्यक्रम यासंबंधीच्या समस्या, मुद्दे आणि ते दूर करण्यासाठी प्रयत्न या समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून करून विद्यार्थी व पालकांचे समाधान केले असे डॉ.भंगाळे यांनी सांगितले.

प्रा.धिरज पाटील यांनी खुल्या व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना इंजिनीअरिंग विभागामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची, अटींची व निकषांची परिपूर्ण माहिती दिली. तसेच फॅसिलीटेशन सेंटरवर पुरविल्या जाणाऱ्या सुविधा व त्यांची कार्यपद्धती आणि चालू वर्षातील इंजिनीअरिंग प्रवेश प्रक्रियेतील नियम व त्यातील वेगळेपणा या मुद्द्यांची माहिती अधोरेखित केली.

या मार्गदर्शनामध्ये विद्यार्थी व पालकांच्या प्रवेश प्रक्रियेसंबंधीच्या उपस्थित सर्व प्रश्नांचे निरसन करण्यात आले. विद्यार्थी व पालकांच्या सोयीसाठी अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया सुरू होईपर्यंत हे समुपदेशन केंद्र मार्गदर्शनासाठी सकाळी ९.०० ते संध्या. ७.०० पर्यंत खुले राहणार असून विद्यार्थी व पालकांनी त्यांच्या प्रश्नांचे निरसन करून घ्यावे, असे आवाहन प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह यांनी केले आहे. या समुपदेशन केंद्राच्या उद्धाटनप्रसंगी डॉ.गिरीश कुलकर्णी, प्रा.दिनेश पाटील, प्रा.मनीष माटा, प्रा.धिरज चौधरी आदी उपस्थित होते.

Add Comment

Protected Content