Home Cities जळगाव चिनी कोंबडी, राजहंस आणि टर्कीं पक्ष्यांनी वेधले जळगावकरांचे लक्ष

चिनी कोंबडी, राजहंस आणि टर्कीं पक्ष्यांनी वेधले जळगावकरांचे लक्ष


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात सध्या विदेशी आणि आकर्षक पक्षांची मोठी चर्चा रंगली असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून विक्रीसाठी आणलेल्या विविध पक्ष्यांनी जळगावकरांचे लक्ष वेधून घेतले आहे. विशेषतः चिनी कोंबडी, राजहंस, टर्की आणि बदकांच्या विविध प्रजाती पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी उसळत आहे.

शहरातील इच्छा देवी मंदिरासमोर, पेट्रोल पंपाच्या शेजारी विविध रंग, आकार आणि वैशिष्ट्ये असलेले हे पक्षी विक्रीसाठी मांडण्यात आले आहेत. या अनोख्या उपक्रमामुळे पक्षीप्रेमी, शेतकरी आणि फार्महाऊस धारक मोठ्या संख्येने येथे भेट देत असून खरेदीलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

यात सर्वात मोठे आकर्षण ठरले आहे ते ‘चिनी कोंबडी’ गिनी फाउल. विक्रेते रणजीत सोनकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कोंबडी सलग ६ ते ८ महिने अंडी देण्याची क्षमता ठेवते. तिचे आकर्षक रूप आणि उपयोगिता यामुळे ग्राहकांमध्ये तिची मोठी मागणी आहे. या कोंबड्यांची जोडी साधारणतः १,१०० ते १,३०० रुपयांदरम्यान विकली जात आहे.

याशिवाय येथे राजहंस, टर्की कोंबड्या आणि विविध प्रकारची बदकेही उपलब्ध आहेत. पांढरेशुभ्र राजहंस आणि डौलदार बदकांच्या जोड्या ३,००० ते ८,००० रुपयांपर्यंत विकल्या जात असून, त्यांच्या आकर्षक हालचाली आणि सौंदर्यामुळे अनेक जण त्यांच्याकडे आकृष्ट होत आहेत. टर्की कोंबड्यांनाही शेतकरी आणि व्यावसायिकांकडून चांगली मागणी दिसून येत आहे.

हे सर्व पक्षी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून खास जळगाव बाजारपेठेसाठी आणण्यात आले आहेत. केवळ शोभेसाठीच नव्हे तर शेतातील वातावरण अधिक आकर्षक करण्यासाठी आणि पूरक उत्पन्नाच्या दृष्टीनेही अनेक हौशी लोक या पक्षांची खरेदी करत आहेत. रस्त्याने येणारे-जाणारे नागरिकही या पक्षांना पाहण्यासाठी थांबत असून, प्रदर्शन परिसरात उत्साही वातावरण निर्माण झाले आहे.

“उत्तम अंडी देण्याची क्षमता आणि पाहताक्षणी मोहून टाकणारे रूप यामुळे चिनी कोंबड्यांना मोठी मागणी आहे,” असे विक्रेते रणजीत सोनकर यांनी सांगितले. त्यांच्या मते, येत्या काही दिवसांत या पक्षांची विक्री आणखी वाढण्याची शक्यता आहे.

जळगावात सुरू असलेले हे विदेशी पक्षांचे प्रदर्शन केवळ व्यावसायिक उपक्रम न राहता नागरिकांसाठी एक आकर्षण आणि माहितीचा स्रोत ठरत आहे. विविध प्रजातींच्या पक्षांबद्दल जाणून घेण्याची आणि त्यांना जवळून पाहण्याची संधी नागरिकांना मिळत आहे.


Protected Content

Play sound