सावदा- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चिनावल येथे जुना सावदा रस्त्यालगत असलेल्या शेतात अज्ञात व्यक्तींनी केळीची सुमारे ३५०० खोडे कापून टाकल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. ही शेती खेमा कामा पाटील यांची असून, त्यांनी आपल्या शेतात मेहनतीने उभी केलेली केळीची लागवड एका रात्रीत उद्ध्वस्त करण्यात आली. यामुळे परिसरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

विशेष म्हणजे, मागील काही महिन्यांपासून चिनावल परिसरात अशा स्वरूपाच्या घटनांना ब्रेक लागलेला होता. मात्र, आज पुन्हा एकदा अशा प्रकाराची सुरुवात झाल्याने परिसरातील नागरिक आणि शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे खेम पाटील यांना आर्थिकदृष्ट्या मोठा फटका बसला असून, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सदर प्रकार कोणाच्या हातून घडला याबाबत अजून कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही. स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांनी पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घ्यावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी केली आहे. यासंदर्भात सावदा पोलीस माहिती कळताच पोलिसांनी शेताकडे धाव घेतली असून पुढील तपास पोलीस करत आहे.



