नवी दिल्ली । भारत व चीनमध्ये तणाव वाढला असतांनाच लडाखमधील जवळपास १ हजार चौरस किलोमीटर भूभाग चीनच्या नियत्रणाखाली गेल्याचं वृत्त द हिंदू या इंग्रजी वृत्तपत्रानं दिलं आहे.
अलीकडच्या कालखंडात भारत आणि चीन या देशांदरम्यान तणावाचं वातावरण आहे. गलवान खोर्यात झालेल्या संघर्षानंतर दोन्ही देशांतील तणाव मोठ्या प्रमाणात वाढला होता. त्यानंतर वरिष्ठ पातळीवरील चर्चाही पार पडल्या. मात्र चीनच्या कुरापती अद्यापही कमी होत नाहीत. चीनकडून घुसखोरीचे प्रयत्न सुरू अद्यापही सुरू आहेत. परंतु भारतीय लष्करानं त्यांचे मनसुबे उधळून लावले. दोन्ही देशांमधील तणाव वाढला असतानाच लडाखमधील जवळपास १ हजार चौरस किलोमीटर भूभाग चीनच्या नियत्रणाखाली गेल्याचं वृत्त द हिंदू या इंग्रजी वृत्तपत्रानं दिलं आहे.
लडाखमधील नियंत्रण रेषेजवळील १ हजार चौरस किलोमीटर भूभागावर चीनचं नियंत्रण आहे. गुप्तचर विभागानं दिलेल्या माहितीवरून यासंदर्भातील माहिती मिळाली असल्याचं एका वरिष्ठ अधिकार्यानं सांगितल्याचे या वृत्तात म्हटलं आहे. डेपसांगपासून चौशुलपर्यंत चीननं आपली लष्करी ताकद वाढवली आहे. तसंच ९०० चौरस किलोमीटरचा भाग चीनच्या नियंत्रणाखाली आहे. गलवान खोर्यातील २० चौरस किलोमीटर, हॉटस्प्रिंगमधील १२ चौरस किलोमीटर, पँगाँग त्सो परिसरातील ६५ चौरस किलोमीटर तर चौशुलमधील २० चौरस किलोमीटर भाग चीनच्या ताब्यात असल्याची माहिती मिळाल्याचं या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.