फैजपूर, प्रतिनिधी | रावेर तालुक्यातील लोहारा येथील लोक सेवक मधुकरराव चौधरी माध्यमिक आश्रमशाळेत शुक्रवारपासून (दि.२२) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, सिलेज बेस्ड एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम, विज्ञान प्रसार नवीदिल्ली व धनाजी नाना महाविद्यालयाच्या वतीने दोन दिवशीय विज्ञान बालमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्राचार्य प्रा. पी.आर.चौधरी यांनी आज (दि.२०)दिली.
या मेळाव्यात आठवी ते दहावीचे अनुसूचित जमातीचे शंभरावर विद्यार्थी सहभागी होणार आहेत. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी व संशोधनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील त्याचे उद्घाटन करणार असुन याप्रसंगी आमदार शिरीष चौधरी अध्यक्षस्थानी असतील. राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप रामू पाटील, राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान केंद्र मुंबईचे सल्लागार डॉ.अजित पाटणकर व समन्वयक डॉ.सुभाष बेंद्रे, सातपुडा विकास मंडळ पालचे सचिव अजित पाटील, व्यवस्थापन परिषद सदस्य दिपक पाटील, नितीन बारी व लोकसेवक मधुकरराव चौधरी फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्हि.आर पाटील हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
शनिवारी या मेळाव्याचा समारोप प्रा.सुभाष बेंद्रे यांच्या उपस्थितीत होणार असुन त्यावेळी अध्यक्षस्थानी अजित पाटील असतील. डॉ.एच.एल. तिडके, उपप्राचार्य अनिल सरोदे, डॉ.सतीश चौधरी, मुख्याध्यापक सुधाकर झोपे हे मेळाव्याचे संयोजन करीत असुन नितीन सपकाळे, जितेंद्र पाटील, भरत पाटील, ललित पाटील, चेतन इंगळे त्यांना मदत करीत आहेत.