एरंडोल (प्रतिनिधी) आजोळी आलेली चिमुकली मुलं खेळत-खेळत आजोबांच्या घरापासून दुर निघून गेली. त्यामुळे घरातील सर्व मंडळी घाबरुन गेली व त्यांचा शोध घेऊ लागली. परंतू शहरातील एका सुज्ञ नागरिकाच्या समय सुचकतेमुळे सोशल मिडीयाच्या माध्यमातून हरवलेली मुलं आपल्या पालकांना अवघ्या चार तासात मिळाल्याची सुखद घटना एरंडोल येथे घडली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, चोपडा येथील सासुरवाशीण कविता शाम माळी या आपल्या साई (वय ४) व लकी (वय ६) या मुलांसोबत एरंडोल येथील अमळनेर दरवाजा परिसरातील रहिवाशी आपले वडील किसन बाळू माळी यांच्या प्रकृती बघण्यासाठी आल्या होत्या. सोमवारी दुपारी एक वाजता मुलं बाहेर खेळत असतांना अचानक गायब झाली.
यादरम्यान एरंडोल येथील रहिवाशी दिपक विश्वास पाटील यांना ही मुलं एकेठिकाणी रडतांना दिसली .त्यांनी मुलांची आस्थेवाईकपणे चौकशी केली व त्यांना घराचा पत्ता विचारला. परंतु मुलं ही छोटी तशात नविन ठिकाणी असल्याने घाबरून गेली होती. त्यामळे बोलण्याच्या मनस्थिती नव्हते. दिपक पाटील यांनी जवळपास दोन तास गावात फिरुन मुलांच्या पालकांची चौकशी केली. परंतु त्यांना त्या मुलांचे पालक मिळाले नाही. त्यामुळे शेवटी दिपक पाटील यांनी मुलांना पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी मुलांना खाऊ दिला व त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. काही क्षणात मुलांची आई पोलीस स्टेशनला दाखल झाली. आपल्या मुलांना सुखरूप बघुन त्या मातेचा अश्रुंचा बांध फुटला. एरंडोल पोलिस व दिपक पाटील यांच्या समय सुचकतेमुळे आईला तिचे मुलं अवघ्या चार तासात परत मिळाली.