जळगावात बाल राज्य नाट्य स्पर्धेस प्रारंभ

जळगाव प्रतिनिधी । शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे १६ व्या बाल राज्य नाट्य स्पर्धेस आजपासून भैय्यासाहेब गंधे नाट्यगृहात प्रारंभ करण्यात आला आहे.

यावेळी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या हस्ते नटराज पूजन, दीपप्रज्वलन व घंटापूजनाने स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी प्राथमिक उपशिक्षणाधिकारी गायकवाड, माध्यमिक शिक्षण विभागाचे माळी उपस्थित होते. सुरुवातीस बाल राज्य नाट्य स्पर्धा समन्वयिका सौ.सरिता खाचणे यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात त्यांनी ग्रामीण भागातील लहान मुलांमधील सुप्त गुण वाढीस लागून उद्याचा सुजाण नागरिक घडावा यासाठी बालनाट्य स्पर्धा हे हक्काचे व्यासपीठ असून, शाळांनी आपला सहभाग जास्तीत जास्त संख्येने नोंदवून या स्पर्धा यशस्वीतेसाठी मदत केल्याचे सांगितले. प्रास्ताविकानंतर उपस्थित मान्यवरांचे पुस्तक देवून स्वागत करण्यात करण्यात आले.

लहान मुलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी बालनाट्य स्पर्धांची आज खर्या अर्थाने गरज आहे. या स्पर्धेत बाल मित्रांनी व शाळांनी मोठ्या संख्येने सहभागी होवून या कलेचा आनंद घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.

आजच्या स्पर्धेची सुरुवात अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलच्या अमोल संगीता अरुण लिखीत दिग्दर्शित वाघोबा या बालनाट्याने झाली. यानंतर अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ, अमळनेर यांनी संदीप घोरपडे दिग्दर्शित अमोल संगीता अरुण लिखीत धरती के संग – रंग बेरंगी हे बालनाट्य सादर केले. स्पर्धेचे परिक्षक डॉ.स्वाती वेदक, प्रमोद काकडे, जुई बर्वे यांनी काम पाहिले.

Add Comment

Protected Content