पहूर येथील महिलेसह मुलाचा अपघातात मृत्यू ; चिमुकली बचावली

 

पहूर , ता जामनेर प्रतिनिधी ।  कोरोनाशी यशस्वी लढा देवून घरी परतलेल्या पहूर येथील भाजीपाला विक्रेत्या महिलेसह मुलाचा  शिवना – मादणी मार्गावर  झालेल्या अपघातात दुर्देवी  मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज घडली .यात त्यांची  चिमुकली नात ऐश्वर्या जखमी झाली असून तीला जळगाव येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे .

या बाबत अधिक माहिती अशी की , मालताबाई सुभाष थोरात यांची लहान सुन शितल सागर थोरात यांचे माहेर लाखनवाडा (जि. बुलढाणा ) येथे आहे.  बाळंतपणानंतर माहेराहून सूनेला पहूर गावी आणण्याकरीता आज  रविवारी सकाळी मालताबाई त्यांच्या स्वतः च्या पॅजो मालवाहू गाडीने मुलगा सागर व नात ऐश्वर्या यांच्यासह  लाखनवाडा येथे जाण्यासाठी निघाल्या होत्या  .

प्रवास सुरु असतानाच आज रविवारी (ता .११) दुपारी साडे बाराच्या सुमारास शिवना – मादणी  मार्गावर समोरून आलेल्या दुचाकी  ( एम . एच . २० एफ . ६४ ८१ ) आणि लाखनवाड्याकडे जाणाऱ्या त्यांच्या पॅजो ( एम . एच . १९ .३३७२ ) यांच्यात जोरदार धडक झाली . या अपघातात  मालताबाई सुभाष थोरात ( वय – ५०वर्षे ) यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला . तर त्यांचा मुलगा पॅजो चालक सागर थोरात ( वय २५ ) यांची जळगांव येथे उपचारार्थ दाखल करण्यापूर्वीच प्राणज्योत मालवली. सुदैवाने ७ वर्षांची चिमुकली ऐश्वर्या  थोरात या अपघातातून बचावली असून दुचाकी वरील दोघे जण ( रा . मादणी ) जखमी झाले आहेत. 

घटनेची माहिती मिळताच अजिंठा पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.  आजूबाजूच्या लोकांनीही अपघातग्रस्तांना दवाखान्यात नेण्यासाठी तातडीची मदत केली.

Protected Content