जळगाव, प्रतिनिधी | धरणगाव येथील विषारी द्रव्यसेवन केलेल्या बालकाला उपचारासाठी मंगळवारी सायंकाळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी सकाळी या बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
धरणगावपासून काही अंतरावर असलेल्या जाफर अन्वर यांच्या शेतशिवारात सालदार दिलीप याचा मुलगा विक्रम पावरा (वय १५, रा. धरणगाव ) याने फवारणीसाठी आणलेले विषारी द्रव्यसेवन केले. त्यास मंगळवारी सायंकाळी ५ वाजेदरम्यान जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. या बालकाची प्रकृती चिंताजनक होती. बुधवारी सकाळी या बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दुपारी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला.