सावदा येथे मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी स्वीकारला पदभार; सौरभ जोशी यांना निरोप

सावदा, ता. रावेर प्रतिनिधी | येथील मुख्याधिकारी सौरभ जोशी यांची बदली झाल्यानिमित्त आज त्यांना नगरपालिकेत निरोप देण्यात आला. तर आजच नवीन मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी या पदाचा कार्यभार सांभाळला.

याबाबत वृत्त असे की, नुकत्याच राज्यातील मुख्याधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या. यात सावदा येथील मुख्याधिकारी सौरभ जोशी यांची औरंगाबाद महापालिकेत उपायुक्त म्हणून बदली झाली. तर त्यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या जागी फैजपूर येथून किशोर चव्हाण यांची सावदा येथे मुख्याधिकारीपदी बदली करण्यात आली.

दरम्यान, आज नगरपालिकेतील एका कार्यक्रमात सौरभ जोशी यांचा हृद्य सत्कार करून त्यांना निरोप देण्यात आला. याप्रसंगी श्री जोशी ब्हणाले की, बदल हा कितीही नकोसा वाटत असला तरी तो सृष्टीचा नियम आहे. आज सावदा येथून बदली झाल्यावर बरेच जण मला भेटण्यासाठी आले. मी अगदी रात्री पर्यंत सर्वांसोबत होतो त्यामुळे आपल्याला उद्या पासून या कार्यालयात परत येऊन काम करायचे नाही याचा नकळत विसर पडला. आता जेव्हा निवासस्थानी आलो तेव्हा अचानक उद्या पासून या ठिकाणी आपण नसणार याची जाणीव प्रकर्षाने झाली. यामुळे डोळे पाणावले. सहवासाने एक नाते निर्माण होत असते तसे नाते माझे आपल्या सर्वांसोबत निर्माण झाले आहे. मागच्या साधारण साडेतीन वर्षांपासून माझ्यासाठी सावदा नगरपालिका हा देखील माझा परिवार आहे. त्यापासून दूर जाताना अतिशय दुःख होत आहे. माझ्या कार्यकाळात आपण केलेल्या सहकार्याबद्दल सर्वांचे आभार असे भावपूर्ण मनोगत सौरभ जोशी यांनी व्यक्त केली.

याप्रसंगी माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, राजेंद्र चौधरी. सौ नंदा लोखंडे, सिद्धार्थ बडगे, राष्ट्रवादी गटनेते फिरोज खान, गुड्डू मेंबर, किशोर बेंडाळे, सौ विजया जावळे, सौ मीनाक्षी कोल्हे आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी केक कापून व शाल, श्रीफळ तसेच हार-गुच्छांसह सौरभ जोशी यांना निरोप देण्यात आला.

दरम्यान, हा निरोप समारंभ पार पडल्यानंतर आज सावदा नगरपरिषदचे  मुख्याधीकारी म्हणून किशोर चव्हाण यांनी सौरभ जोशी यांच्या कडून मुख्याधिकारी पदाचा पदभार स्वीकारला. याप्रसंगी सौरभ जोशी, किशोर चव्हाण आणि त्यांच्या सौभाग्यवती तथा जळगावच्या शिक्षण विस्तार अधिकारी रागिणी चव्हाण यांचा प्रशासनातर्फे सत्कार करण्यात आला.  ह्या वेळेस किशोर चव्हाण यांनी सहकार्‍यांची ओळख करून घेत आपल्या कामकाजास प्रारंभ केला.

 

Protected Content