अमळनेर (प्रतिनिधी) जळगाव लोकसभा मतदारसंघात चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांना खासदारकीची उमेदवारी दिल्यापासून भाजपातील अंतर्गत गटबाजीमुळे वातावरण तापलेले आहे. हे वातावरण शांत करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुद्द अंमळनेरमध्ये प्रचार सभा घ्यावी लागत आहे. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 19 एप्रिल रोजी शुक्रवारी अमळनेरात येत आहेत. यासोबत त्यांची रावेर येथेही सभा होणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज नाट्य शेजारील भव्य पटांगणावर उद्या सकाळी दहा वाजता ही जाहीर सभा होणार असून सभेची जय्यत तयारी अमळनेरमध्ये सुरू आहे. मुख्यमंत्री येणार म्हणून कार्यकर्ते कामाला लागले आहेत. नुकताच मागे भाजप प्रचारार्थ सभा घेण्यात आली होती. त्या सभेमध्ये हाणामारी झाली याचे पडसाद पूर्ण महाराष्ट्रभर पसरले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून वाद शमतील का ? सर्व भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते एकसंघ होतील का ? अंतर्गत वाद संपतील का? सर्व भाजपाचे पदाधिकारी व्यासपीठावर एकत्र येतील का?अशी अनेक प्रश्न मतदारांमध्ये निर्माण झाले आहेत. पण मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर सारेजण एकत्र कामाला लागतील अशी चर्चा भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये केली जात आहे.
तर रावेर लोकसभेसाठी महायुतीच्या उमेदवार खासदार रक्षाताई खडसे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रावेर येथे दुपारी १ वाजता सभा होणार आहे. बर्हाणपूर रोडवरील शिवप्रसाद नगरात या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.