जळगाव (प्रतिनिधी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यानिमित्त डागडुजी सुरु असतांना खड्डा चुकविताना ट्रकखाली 19 वर्षीय तरूण सौरभ मालवाणी याचा जीव गेला. दुसरीकडे भर दिवसा एका दाम्पत्याला लुटण्यात आले. कायदा-सुव्यवस्था आणि मुलभूत सुविधा किती चांगल्या आहेत, याचे उत्तर मागील पाच वर्षाचा हिशोब द्यायला आणि महाजनादेश घ्यायला निघालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिळालेच असेल. पण तरी हिंमत असेल तर सौरभच्या आई-वडिलांना…सौरभच नव्हे तर, समांतर रस्ते, महामार्गावरील खड्ड्यांमुळे मागील पाच वर्षात जीव गमावलेल्या शेकडो परिवारांना व अर्धे शहर खोदून ठेवल्यामुळे कमालीचा त्रस्त असलेल्या सर्वसामान्य जळगावकराला भेटून महाजनादेशाबाबत मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली पाहिजे.
सौरभ गोपालदास मनवाणी (वय-19, रा. सिंधी कॉलनी, हनुमान नगर, भुसावळ) हा बांभोरी येथील एसएसबीटी महाविद्यालयाच्या सिव्हील इंजिनिअरींगच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. शिक्षण घेण्यासाठी सौरभ दुचाकी क्रमांक (एमएच 19 डीके 8303)ने भुसावळहून रोज येजा करत होता. सायंकाळी महाविद्यातून जळगावात मित्र हर्षल शांताराम सपकाळे सोबत दुचाकीवरून येत होता. यावेळी दुचाकी हर्षल चालवत होता तर पाठीमागे सौरभ बसलेला होता. यावेळी मुख्यमंत्री येणार म्हणून रस्त्याच्या डागडूजीचे काम सुरु होते. परंतू साचलेल्या पाण्यामुळे खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे दुचाकी घसरली आणि सौरभला पडताच त्याला मागून येणाऱ्या ट्रकने चिरडले. समांतर रस्ते, महामार्गावरील खड्ड्यांमुळे जळगाव जिल्ह्यातील शेकडो तरुणांनी आतापर्यंत जीव गमावलाय. त्यांच्या परिवाराला भेटायची हिंमत ठेवा. तुम्ही आणि तुमच्या लोकप्रतिनिधी, मंत्र्यांनी किती काम केले? याचा लेखाजोखा त्यांचे परिवारवाले तुम्हाला देतील.
जळगाव शहरात दोन नंबरचे धंदे, खून, हल्ले, घरफोड्या,वाळू चोरी या गोष्टी तर जणू कायदेशीर मान्यता असल्यागत सुरु आहेत. कधीकाळी रात्री होणाऱ्या चोऱ्या आता दिवसाढवळ्या होताय. अगदी मुख्यमंत्री सर्वसामान्य जळगावकरांना भेटल्यास पोलीसं खाते जिल्ह्यात कार्यरत आहे की नाही? असाच सवाल विचारतील, इतकी वाईट परिस्थिती जिल्ह्यात आहे. मुख्यमंत्री फडणवीस हे जिल्ह्यात येणाच्या एक दिवस आधी खड्ड्यांमुळे एका तरुणाचा जीव जातो. तर एका दाम्पत्याला लुटले जाते. तसेच एका तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळतो. मुख्यमंत्री साहेब जळगाव शहरात येताय. तर सर्वसामान्य जळगावकरांना भेटा. सोशल मीडियात खड्ड्यांविरोधात अभिनव आंदोलन करणाऱ्या तरुणांना विचारा की, जळगाव शहराची अवस्था काय आहे? हारतुरे घेऊन येणारे कार्यकर्ते सर्व आलबेल असल्याचे सांगतील. पण खरी हकीगत काही औरच आहे. अर्थात तुम्हालाही खरा महाजनादेश जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही सौरभ सारख्या जीव गमावलेल्या शेकडो तरुणांच्या आई-वडिलांसह सर्वसामान्य जळगावकरांना भेटाल. अन्यथा जळगाव शहर स्मार्ट सिटी आहेच !