नवी दिल्ली, वृत्तसंस्था | आयएनएक्स मीडिया घोटाळ्यात मी कधीही आरोपी नव्हतो. माझ्या किंवा माझ्या कुटुंबीयांविरोधात कोणतेही आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही. त्यामुळे मी आरोपी नाही, असे सांगतानाच तपास यंत्रणांनीही कायद्याचे पालन करावे, असे ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी सांगितले. तब्बल २७ तासांनंतर चिदंबरम यांनी पत्रकार परिषद घेऊन हा खुलासा केला.
मंगळवार सायंकाळपासून ईडी आणि सीबीआयला सापडत नसलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम अखेर २७ तासांनंतर मीडिया समोर आले. रात्री उशिरा काँग्रेस कार्यालयात दाखल होऊन त्यांनी त्यांच्या वकिलांसोबत पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. मी आयएनएक्स मीडिया घोटाळ्यात मी किंवा माझा मुलगा आरोपी नाही. आमच्यावर कोणतेही आरोपपत्रं दाखल करण्यात आलेले नाही. आम्हाला या घोटाळ्यात गोवले गेले आहे. आमच्यावरील सर्व आरोप खोटे असून तपास यंत्रणांनी कायद्याचे पालन करावे, असेही चिदंबरम म्हणाले. या खटल्याशी लढण्याची वकिलांसोबत तयारी करत होतो. त्यामुळे तुमच्यासमोर येऊ शकलो नाही, असे त्यांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच स्पष्ट केले. तसेच आपल्याला फरार म्हटले जात असल्याबद्दलही त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.