मुंबई वृत्तसंस्था । महाविकास आघाडी राज्यात सत्तास्थापनेच्या दिशेने कूच करत आहे. लवकरच उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. तथापि, यादरम्यान महाविकास आघाडीला आयएनएक्स मीडिया प्रकरणात सध्या “तिहार” तुरुंगात असलेले माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी आपल्या ट्विटव्दारे मोलाचा सल्ला दिला आहे.
राज्यात शिवसेना, भाजपा आणि कॉंग्रेस या तिन पक्षांची मिळून महाविकास आघाडी तयार झाली असून महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांनी स्वतःचे वैयक्तिक धोरण बाजूला ठेवून किमान समान कार्यक्रमानुसार सरकार चालवावे. चिदंबरम म्हणतात, ‘महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट उठवण्याकरीता सह्यांसाठी पहाटे चार वाजता राष्ट्रपती कार्यालयाला पाचारण करण्यात आले हा या कार्यालयावरील एक प्रकारचा हल्लाच होता. यासाठी सकाळी ९ वाजेपर्यंत वाट का पाहण्यात आली नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.’
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीला चिदंबरम यांनी तुरुंगातून शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर त्यांनी या आघाडीला सरकार चालवताना काही सल्लेही दिले आहेत. त्यांनी म्हटले की, ‘कृपया तुम्ही प्रत्येकाच्या पक्षहिताला सरकारमध्ये दुय्यम स्थान देत शेतकरी कल्याण, गुंतवणूक, रोजगार, सामाजिक न्याय आणि महिला व बालकल्याण या प्राधान्यक्रमाच्या तिन्ही पक्षांच्या समान कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी एकत्रितपणे काम करा. ७४ वर्षीय चिदंबरम यांनी केंद्रात आघाडीची सरकारं बनवण्यात महत्वाचं योगदान दिले आहे.