धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण हिंदुस्थानाचे आराध्य दैवत असून, त्यांनी सर्व जाती-धर्मातील मावळ्यांना समान न्याय देत सामाजिक क्रांतीचा पाया रचला. शिव व्याख्याते संजीव सोनवणे यांनी शिवजयंती निमित्त आयोजित व्याख्यानात हे प्रतिपादन केले.
येथील उबाठा शिवसेनेच्या वतीने साने पटांगण, कोट बाजार येथे शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात संजीव सोनवणे यांनी छत्रपती शिवरायांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला. त्यांनी आपल्या एक तासाच्या प्रबोधनात अफजलखान वधापासून धर्मवीर संभाजी महाराजांपर्यंतचा रोमांचक इतिहास उलगडला.
सोनवणे म्हणाले, “जाती-धर्माच्या भिंती पार करत, माणसाला माणुसकीने जगायला शिकविणारे राज्य म्हणजे छत्रपती शिवरायांचे स्वराज्य होते. अखंड भारताचे आराध्य दैवत म्हणून शिवराय आजही पूजनीय आहेत. आमावस्येच्या रात्री युद्ध करून विजय मिळवणारे, अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश देणारे आणि अत्याचाराविरोधात लढा देणारे शिवबा हेच खरे न्यायप्रिय राजा होते.”
छत्रपती शिवरायांनी ३५० वर्षांपूर्वी सुरू केलेली जलसंधारण आणि गडकिल्ल्यांची व्यवस्था आजही तितकीच प्रभावी आहे. त्यांनी रणनीतीने मुघलांवर विजय मिळवला आणि स्वराज्य स्थापन केले. त्यांच्या सैन्यात अठरापगड जातींचे मावळे होते आणि सर्वांना समान न्याय मिळत असे. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. जिल्हा संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली आणि उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
या प्रसंगी उबाठा शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत, जिल्हा प्रमुख कुलभूषण पाटील, दीपकसिंह राजपूत, भाऊसाहेब सोनवणे, विजय राठोड, माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, जीवन बयस, निलेश चौधरी, महिला जिल्हा प्रमुख महानंदाताई पाटील, शहर प्रमुख भागवत चौधरी, डी. आर. पाटील सर, डॉ. संजीवकुमार सोनवणे, जानकीराम पाटील, जयदीप पाटील, दीपक सोनवणे, धनराज माळी, रविंद्र भिला पाटील, पी. एम. पाटील, लक्ष्मण पाटील, वसंतराव भोलाणे, उषाताई वाघ, कीर्ती मराठे, बापू माळी, कृपाराम माळी, परमेश्वर माळी, लक्ष्मण माळी यांच्यासह गावातील सर्व समाज अध्यक्ष, संचालक मंडळ व आर्थिक संस्था अध्यक्ष उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण अग्निहोत्री यांनी केले, तर आभार अॅड. शरद माळी यांनी मानले. या कार्यक्रमासाठी पोलिस निरीक्षक पवन देसले यांनी चोख बंदोबस्त ठेवला.