अकुलखेड्याच्या चेतना मराठेचा संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते सत्कार

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भारत सरकार आयोजित वीर गाथा प्रोजेक्टमधील टॉप 25 मध्ये असलेल्या चोपडा तालुक्यातील अकुलखेडे येथील चेतना गणेश मराठे हिचा संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते नवी दिल्लीत सत्कार करण्यात आला.

देशासाठी झटणाऱ्या जवानांचे आयुष्य, त्यांनी दाखविलेले अतुलनीय शौर्य आणि बलिदानाची गाथा समाजासमोर नेण्यासाठी भारत सरकारतर्फे वीर गाथा प्रोजेक्टची सुरुवात करण्यात आली आहे. या प्रोजेक्टमधील टॉप 25 मध्ये असलेल्या चोपडा तालुक्यातील अकुलखेडे येथील चेतना गणेश मराठे हिचा संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते नवी दिल्लीत सत्कार करण्यात आला. ती सध्या महू येथील आर्मी स्कूलमध्ये सहावीत शिक्षण घेत आहे.

वीर गाथा प्रोजेक्टअंतर्गत देशातील सुपर 25म्हणजेच सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. 12 ऑगस्ट रोजी, शुक्रवारी देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते या 25 विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यात महाराष्ट्रातील, जळगाव जिल्ह्यातील चेतना गणेश मराठे हिचा समावेश होता. ती सध्या मध्य प्रदेशातील महू येथील आर्मी स्कूलमध्ये सहावीची विद्यार्थिनी आहे. तिचे वडील गणेश मराठे हे त्याच शाळेत कला शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

कारगील युद्धातील हिरो कॅप्टन मनोजकुमार पांडे यांची चित्रगाथा –

चेतनाने कारगील युद्धातील हिरो असलेले कॅप्टन मनोज कुमार पांडे यांची चित्रगाथा साकारली होती. त्यांच्या शौर्य, धैर्य आणि बलिदानाचे योगदान चेतनाने चित्रातून सुंदरपणे दाखवून दिले आहे. तिचे हे चित्र “सुपर 25” साठी पात्र ठरले. तिला या समारंभात राजनाथ सिंह यांच्या हस्ते विशेष प्रमाणपत्र, पदक आणि रोख दहा हजारांचे बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले..

देशभरातील 4,788 शाळांमधील 8 लाख विद्यार्थ्यातून निवड –

वीर गाथा हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवचा एक भाग म्हणून सुरू करण्यात आलेल्या अनोख्या प्रकल्पांपैकी एक आहे. मुलांना प्रेरणा देण्यासाठी आणि सशस्त्र दलांच्या वीर कृत्ये आणि बलिदानाबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी हे आयोजन करण्यात आले होते. दि. 21 ऑक्टोबर ते 20 नोव्हेंबर 2021 या कालावधीत झालेल्या या देशव्यापी स्पर्धेत 4,788 शाळांमधील 8.04 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना निबंध, कविता, चित्रण आणि मल्टीमीडिया सादरीकरणाद्वारे प्रेरणादायी कथा शेअर करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. या स्पर्धेतील मूल्यमापनाच्या अनेक फेऱ्यांनंतर 25 विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना सुपर-25 म्हणून घोषित करण्यात आले. 

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्सवाचा भाग –

स्वातंत्र्य दिन – 2022 च्या उत्सवाचा एक भाग म्हणून, राजनाथ सिंह यांनी या सुपर- 25 विद्यार्थ्यांना 10,000 रुपये रोख, एक पदक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले. यावेळी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट उपस्थित होते. याशिवाय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी, नौदलाचे प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार, संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार आणि लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल बीएस राजू हेही उपस्थित होते. या कार्यक्रमाला 300 एनसीसी कॅडेट्स आणि आर्मी पब्लिक स्कूल आणि कॅन्टोन्मेंट बोर्डाचे विद्यार्थी आणि 400 हून अधिक शाळांचे विद्यार्थी आणि शिक्षक देखील उपस्थित होते. गॅलेंट्री अवार्डस पोर्टल ऑफ इंडियाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

सुपर 25 च्या सर्जनशीलतेचे कौतुक –

सुपर-25चे अभिनंदन करताना, संरक्षण मंत्र्यांनी त्यांच्या सर्जनशीलतेचे, आवेशाचे आणि उत्साहाचे कौतुक केले. या प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्वांच्या कथांमधून शौर्य आणि बुद्धिमत्ता यांच्यातील समतोल साधण्याचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना समजून घेण्याचे आवाहन केले.

शालेय अभ्यासक्रमात लवकरच सैनिकांच्या शौर्याचा समावेश –

शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी माहिती दिली की, “शिक्षण मंत्रालयाने संरक्षण मंत्रालयाशी सल्लामसलत करून सैनिकांचे शौर्य आणि भारतातील शौर्यगाथा यांचा शालेय अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तकांमध्ये समावेश केला आहे. लहानपणापासूनच राष्ट्राप्रती असलेली जबाबदारी चांगले नागरिक घडविण्याचे काम करेल. त्यांनी सैनिकांच्या सन्मानार्थ स्पर्धेचे नाव बदलून सेना सुपर 25असे सुचवले.

 

काय आहे वीरगाथा प्रोजेक्ट ?  

 

वीर गाथा प्रोजेक्टचे आयोजन केंद्रीय संरक्षण मंत्रालयातर्फे, शिक्षण मंत्रालय आणि माय गव्ह ॲप यांच्या संयुक्त विद्यमाने केले गेले. शौर्य पुरस्कार विजेत्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले गेले. याअंतर्गत विद्यार्थ्यांना शौर्य पुरस्कार विजेत्यांची महती सांगण्यासाठीच्या विविध स्पर्धां घेतल्या गेल्या. कविता, परिच्छेद लिखाण, निबंध, चित्रे आणि इंटरॅक्टिव्ह मल्टीमीडिया व्हिडिओ अशा वेगवेगळ्या विभागात विद्यार्थी आपले कौशल्य दाखवू शकले. यामध्ये तिसरी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी सहभागी झाले होते. या प्रोजेक्टमध्ये केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी (सीबीएसई) संलग्न शाळांव्यतिरिक्त, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले.

 

वीरगाथा प्रोजेक्टमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी शौर्यासाठी पदके आणि सन्मान मिळालेल्या वीरांच्या जीवन आणि त्यागावर एक प्रोजेक्ट तयार केला. हा प्रोजेक्ट कविता, लेख, चित्रे, व्हिडिओसह मल्टी मीडिया सादरीकरणाच्या स्वरूपात होता. यातून 25 प्रोजेक्ट निवडले गेले आणि त्यांना संरक्षण मंत्रालयाकडून प्रत्येकी 10 हजार रुपयांचे रोख बक्षीस दिले गेले. त्याच्या विजेत्यांना सरकारी खर्चाने, विमानाने दिल्लीला आमंत्रित देखील केले गेले होते.

Protected Content