पाटणा (वृत्तसंस्था) बिहारमध्ये छठ पूजा सुरू असताना झालेल्या दोन वेगवेगळ्या घटनांत दोन चिमुरड्यांसह चार जणांचा मृत्यू झाला आहे.
बिहारच्या औरंगाबादमध्ये शनिवारी छठ पूजावेळी घाटावर चेंगराचेंगरी झाली.या चेंगराचेंगरीत दोन चिमुरड्यांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. तर भोजपूर येथील १८ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. सूर्याकुंड येथे झालेल्या या दुर्दैवी घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत. प्रशासनाला या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मृतांच्या नातेवाईकांना लवकर आर्थिक मदत जाहीर केली जाईल, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. तर राज्यातील समस्तीपूर मध्ये झालेल्या अन्य एका घटनेत छठ पूजा घाटावर मंदिराची भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत अन्य काही जण जखमी झाले आहेत.