जळगाव प्रतिनिधी । विधी अभ्यासक्रमाच्या पेपरांची सदोष तपासणी झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले आहे. त्यामुळे सर्व पेपरांची फेरतपासणी करण्यात यावी किंवा विद्यार्थ्यांना मागणीनुसार सर्व विषयांचे फोटोकॉपी आणि रेचेकिंगची सवलत मोफत मिळावी, अशी मागणी आज एका निवेदनाद्वारे कुलगुरूंकडे करण्यात आली आहे. दरम्यान, मागण्या मान्य न झाल्यास विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
विद्यार्थ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विद्यापीठ पेपर तपासणीची पद्धती चुकीची असून चांगले मुद्देसूद, संपूर्ण, योग्य पद्धतीने पेपर लिहून सुद्धा बरेच विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण केलेले आहे. तसेच कमी गुण दिलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झालेला असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात झालेले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निराशेची भावना निर्माण होऊन त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. विद्यापीठाने या गंभीर प्रकाराची दखल घेऊन पुढील वर्षी मिळणाऱ्या विद्या परिषद सभेचा ठराव क्र. ए. 70/2019 चा लाभ याच निकालात मिळावा. विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या ॲग्रीकेट मार्कांमध्ये 50 मार्कांची सवलत मिळावी. अन्यथा विद्यार्थ्यांना त्यांची मागणीनुसार सर्व विषयांचे फोटोकॉपी मिळवून सर्व विषयांची रेचेकिंगची सवलत मोफत मिळावी. या निकालाचा फेरविचार होऊन विद्यार्थ्यांच्या हिताचा व भविष्याचा विचार विद्यापीठाने करावा, अन्यथा विधी महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी आंदोलनाचा मार्ग स्वीकारतील असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.