जळगाव प्रतिनिधी । शहरात बहुचर्चीत असलेल्या बीएचआर घोटाळ्याप्रकरणी राज्यात ८१ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यातील सात गुन्ह्यांमध्ये प्रमोद रायसोनी यांच्यासह १४ संचालकांवर आज मंगळवार ८ डिसेंबर रोजी जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोप सादर करण्यात आले आहे.
जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायधिश आर.एन.हिवसे यांच्या न्यायालयात अमरावती, परभणी, लातुर, सांगली, लातुर व पुण्यात दाखल असलेल्या सात गुन्ह्यांमध्ये हे दोषारोप सादर करण्यात आले आहे. बीएचआरच्या राज्यभरात दाखल असलेल्या गुन्ह्यांची सुनावणी आता जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयात होणार आहे. त्या अनुशंगाने तपास पुर्ण झालेल्या सात गुन्ह्यांमध्ये दोषारोप सादर करण्यात आले. जिल्हा कारागृहात बंदी असलेले संचालक प्रमोद रायसोनीसह १४ जणांना व्हिडीओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी त्यांच्यावर विविध सात कलमांखाली दोष ठेवण्यात आले आहेत. जिल्हा सरकारी वकील अॅड. केतन ढाके यांनी हे दोषारोप सादर केले आहेत. संशयितांतर्फे अॅड. अकील इस्माईल यांनी काम पाहिले.