जळगाव प्रतिनिधी । रेडीरेकनरच्या अडीच टक्के दराने भाडे आकारणी करा या प्रमुख मागणीसह गत नऊ वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावा यासाठी आज शहरातील १६ व्यापारी संकुलाच्या १४०० गाळेधारकांचे प्रतिनिधींनी मनपा महासभेसमोर गांधीगीरी आंदोलन केले.
आंदोलनासाठी मनपा प्रवेशद्वाराजवळ जमलेल्या व्यापाऱ्यांनी सांगितले की, शहरातील १६ व्यापारी संकुलांमधील गाळेधारक न्याय मागण्यासाठी आज येथे आले आहे. आजच्या महासभेत आमच्या मागणीवर निर्णय व्हावा अशी अपेक्षा आहे. राज्यात २७ महापालिकांमधील गाळेधारक व्यापाऱ्यांचे प्रश्न आमच्या सारखेच आहे. त्यामुळे राज्य शासनाने आता जास्त काळ दुर्लक्ष करू नये. टोकाची भूमीका घेवू नका अन्यथा गाळेधारक रस्त्यावर येतील. आधीच दीड वर्षापासून व्यापार थप्प आहे. त्यात मनपा टोकाची भूमीका घेत असेल तर आमच्यापुढे आत्महत्येशिवाय पर्याय नाही. हे सांगायला आम्ही आलो आहोत. मनपा प्रशासन, महापौर व उपमहापौरांवर आमचा विश्वास आहे. ते आम्हाला उध्दवस्त होवू देणार नाही. भाजपचा आम्हाला पाठिंबा आहे त्यामुळेच त्यांनी गाळेधारकांचा निर्णय आजच्या महासभेत न घेता. पुढच्या महासभेत घ्यावा, दरम्यानच्या काळात चर्चेतून मार्ग काढावा अशी भूमीका घेतलेली आहे. शिवसेना व एमआयएम पक्षाकडूनही आम्हाला समर्थनाची आशा आहे.
आजच्या आंदोलनासाठी या व्यापाऱ्यांच्या कुटुंबियातील महिला आणि मुलेही मनपा प्रवेशद्वारासमोर आलेली होती. त्यांनी सांगितले की, शहरातील १४०० गाळेधारक करीत असलेल्या व्यापाऱ्यावर ७ हजार लोक अवलंबून आहे. राज्य सरकारने १३ सप्टेबर २०२० रोजी महापालिका अधिनियम कलम ७९ मध्ये दुरूस्ती करून महापालिका गाळ्यांच्या भाड्यात थेट पाच पट वाढ केली. ही आम्हाला मान्य नाही. रेडीरेकनरच्या अडीच पट भाडे वाढवून योग्य प्रमाणात दंड आकारावा तो भरायला व्यापारी तयार आहे.
राज्यातील काही शहरांमध्ये व्यापाऱ्यांनी तर गतवर्षी कोरोनामुळे १२० दिवस व्यापार थप्प झाल्याने राज्य सरकारकडे आत्महत्येची परवानगी मागीतली आहे. ९ वर्षात आमचे प्रश्न केवळ राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे प्रलंबित आहे. रेडीरेकनरच्या दरात ८ टक्के नव्हे तर फक्त १ टक्का वाढ करावी अशी मागणीही काही शहरातील व्यापारी करीत असल्याचे आज या व्यापाऱ्यांनी सांगितले.