Home क्राईम कांदा मार्केटमध्ये राडा; शेतकऱ्यांना शिवीगाळ करणाऱ्या टोळक्यावर गुन्हा दाखल

कांदा मार्केटमध्ये राडा; शेतकऱ्यांना शिवीगाळ करणाऱ्या टोळक्यावर गुन्हा दाखल


चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव येथील उपबाजार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील कांदा मार्केटमध्ये किरकोळ कारणावरून मोठा राडा झाल्याची घटना घडली आहे. मार्केटमध्ये काम करणारे कर्मचारी आणि शेतकरी यांना शिवीगाळ तसेच दमदाटी करणाऱ्या वाजीद खान व त्याच्या साथीदारांविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, मध्यस्थी करण्यासाठी गेलेले बाजार समितीचे सभापती प्रदीप सुभाष पाटील यांच्याशीही हुज्जत घातली.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी ७ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास नागद रोडवरील कांदा मार्केटमध्ये व्यवहार सुरू असताना संशयित आरोपी वाजीद खान साबिर खान, समीर, वकील, सोहेल (पूर्ण नाव माहीत नाही) आणि त्यांच्यासोबत असलेल्या इतर ४ ते ५ पुरुष व ५ ते ६ महिलांनी विनाकारण गोंधळ घालण्यास सुरुवात केली. संशयित आरोपी हे मार्केटमधील कर्मचाऱ्यांना आणि कांदा विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना अश्लील शिवीगाळ करत होते.

या प्रकाराची माहिती मिळताच बाजार समितीचे सभापती प्रदीप पाटील आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी शिवीगाळ करणाऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता, संशयित आरोपींनी त्यांच्याशीही हुज्जत घालून दमदाटी केली. काही महिलांना बोलावून घेऊन तिथे आरडाओरड केली व बेकायदेशीर मंडळी जमा करून सार्वजनिक शांततेचा भंग केला.

या प्रकरणी सभापती प्रदीप पाटील (वय ४२, रा. डोणदिगर) यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.


Protected Content

Play sound