मुंबई प्रतिनिधी | खासदार संजय राऊत यांनी आपल्या रोखठोक सदरात केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडल्यानंतर सामनाचे आता नाव बदलून आता पाकिस्तान नामा किंवा बाबरनामा करावे, असा खोचक सल्ला भाजप नेते आ. आशीष शेलार यांनी दिला आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपल्या रोखठोक सदरात केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. त्यांनी सामन्यातील रोखठोक सदरात फाळणीचा दिवस विसरु नका, असे पंतप्रधान मोदींचे फर्मान आहे. देशाचे विभाजन म्हणजे अराजकच होते. पाकिस्तान निर्मितीचे गुन्हेगार हे फक्त महात्मा गांधींना ठरवून नथुराम गोडसेंनी गांधींवर गोळ्या झाडल्या. गांधींना मारण्यापेक्षा बॅ. जीनांवर हा प्रयोग झाला असता तर फाळणीचा स्मृतीदिन साजरा करण्याची वेळ आली नसती, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. याला भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर देत टीकास्त्र सोडले आहे.
संजय राऊत यांनी कितीही प्रयत्न केला तरी, या देशाचा वेगळा इतिहास लिहिण्याच्या कॉंग्रेसच्या प्रयत्नांना त्यांनी बळ देण्याचा हा प्रयत्न आहे. जीना यांनी फाळणी केली याबद्दल दुमत असण्याचे कारणच नाही. गोळीबार, हल्ला किंवा खून गाधीजींचा याचे कुणी समर्थन करण्याचा विषयच नाही. संजय राऊत, विपर्यासाचे विच्छेदन करून सत्याला लपवता येत नाही. भारतीय लोकांच्या फाळणीच्या आठवणींना एक अर्थाने इतिहासातून धडा घेऊन, नवा इतिहास घडवण्यासाठीचा तो दिवस पंतप्रधान मोदींनी घोषित केला तर, पाकिस्तानच्या पोटात दुखायला लागले. त्याच पद्धतीच्या भावना संजय राऊत रुपी संपादकाच्या हातून सामनात उतरायला लागल्या. त्यामुळे सामनाने आता नाव बदलून टाकावे, सामनाने त्याचे नाव पाकिस्तान नामा किंवा बाबरनामा करावे, असा खोचक सल्ला आशिष शेलार यांनी दिला आहे.