जळगाव-जितेंद्र कोतवाल/लाईव्ह ट्रेंडस न्यूज स्पेशल रिपोर्ट | विधानपरिषदेचे आमदार चंदूभाई पटेल यांच्या आमदारकीची मुदत संपली असून आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतरच विधानपरिषदेची निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
एकनाथराव खडसे यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतर तीन महिन्यांनी अर्थात नोव्हेंबर २०१६ मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून देणार्या विधानपरिषद सदस्याची निवडणूक जाहीर झाली होती. याआधी मनीष जैन यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या पदावर एकनाथराव खडसे यांचे कट्टर समर्थक डॉ. गुरूमुख जगवाणी यांना संधी मिळाल्याने तेच या वेळेस देखील दावेदार होते. मात्र तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जगवाणींचे तिकिट कापून ना. गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय असणारे व्यावसायिक चंदूभाई पटेल यांना उमेदवारी दिली होती. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी पंधरा मिनिटे आधी पटेल यांनी अर्ज भरला. यावेळी त्यांच्या समोर कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराने अर्ज न भरल्याने बिनविरोध निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट होते. तथापि, विजय भास्कर पाटील यांनी रिंगणात उडी मारल्याने यासाठी निवडणूक झाली.
२२ नोव्हेंबर २०१६ रोजी विधानपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागला. यात भाजपचे उमेदवार चंदूभाई पटेल हे ४२१ मते मिळवून विजयी झाले. तर विजय भास्कर पाटील यांना ९० मते मिळाली. अर्थात, या विजयाच्या माध्यमातून गिरीश महाजन यांनी विधानपरिषदेत आपल्या समर्थकाला निवडून आणण्यात यश संपादन केले होते.
दरम्यान, आमदार चंदूभाई पटेल यांच्या विधानपरिषद सदस्यत्वाची मुदत ही २२ नोव्हेंबर २०२२ रोजी संपली आहे. जिल्ह्यातील नगरपालिका, झेडपी आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका झाल्या असत्या तर नोव्हेंबर महिन्यात विधानपरिषद निवडणूक पार पडली असती. तथापि, या निवडणुका अद्याप झालेल्या नाहीत. यामुळे मतदार नेमके कोण असणार हेच स्पष्ट नसल्यामुळे ही निवडणूक पुढे ढकलली गेली आहे. या निवडणुका पार पडल्यानंतरच विधानपरिषदेची निवडणूक होणार आहे. यामुळे तूर्तास तरी हे पद रिक्त राहणार आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील राजकीय सद्यस्थितीचा विचार केला असता, ना. गिरीश महाजन आणि ना. गुलाबराव पाटील यांच्या दोघांच्या विचारांनीच विधानपरिषदेचा पुढील आमदार ठरणार आहे. यात नेमकी कुणाची वर्णी लागणार ? याबाबत काहीही माहिती नसली तरी अनेकांनी यासाठी आतापासूनच मोर्चेबांधणी केल्याचे अधोरेखीत झाले आहे.