जळगाव (प्रतिनिधी) धरणगाव तालुक्यातील साळवा-बांभोरी नांदेड गटाच्या जिल्हा परिषद सदस्या माधुरी अत्तरदे यांचे पती तथा भुसावळचे स्वीकृत नगरसेवक चंद्रशेखर अत्तरदे यांनी आज जिल्हा परिषद भवनात पुन्हा एकदा दांगडो घातला आहे. यावेळी त्यांनी चक्क सीईओ यांना शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. विशेष म्हणजे अत्तरदे यांनी २०१७ मध्येही बांधकाम विभागातील कर्मचाऱ्याला अश्लील शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर मोठा वादंग उभे राहिले होते.
चंद्रशेखर अत्तरदे हे आपली पत्नी जि.प.सदस्या माधुरी अत्तरदे यांच्यासोबत कामानिमित्त आज (शनिवार) दुपारी १:३० वाजेच्या सुमारास जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांच्या दालनात आले होते. यावेळी सीईओ श्री.पाटील आणि चंद्रशेखर अत्तरदे यांच्यात एका विषयावरून जोरदार शाब्दीक वाद झाला. त्यानंतर सीईओ यांनी सदस्या पती चंद्रशेखर अत्तरदे यांना ‘हू आर यू’ म्हटले, याचाच राग चंद्रशेखर अत्तरदे यांना आला. त्यामुळे त्यांनी जि.प.भवनात आरडाओरड करत सीईओ यांना शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.
नोव्हेंबर २०१७ मध्येही असाच दांगडो
जिल्हा परिषद सदस्या माधुरी अत्तरदे यांचे पती चंद्रशेखर अत्तरदे हे दि. ३० नोव्हेंबर २०१७ रोजी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात आले होते. त्यांनी यावेळी पाचोरा तालुका सावखेडा बु. व चोपडा तालुक्यातील कर्जाणे, देवझिरी, सत्रासेन येथील आरोग्य केंद्राच्या निविदेवरून बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप कापडणीस व कर्मचारी चंद्रभान पाटील यांना अश्लील शिवीगाळ करून त्यांच्या टेबल वर ठेवलेल्या सरकारी फायली ओढून जमिनीवर फेकल्या. यासोबतच चंद्रशेखर अत्तरदे यांनी मोबाईल क्रमांक ९५१८७०६३४६ वरून बांधकाम विभागाचे कर्मचारी चंद्रभान शालिग्राम पाटील यांच्या मोबाइलवर आणि ८८०५५११०७७ वर फोन करून अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशावरून चंद्रभान शालिग्राम पाटील यांच्या फिर्यादीवरून चंद्रशेखर अत्तरदे (रा. गणेश कॉलनी) यांच्याविरुद्ध तक्रार देण्यात आली होती.
कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन
जिप सदस्या माधुरी अत्तरदे यांचे पती चंद्रशेखर अत्तरदे यांनी बांधकाम विभागात येऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांना केलेल्या शिवीगाळ व दमदाटीच्या निषेधार्थ जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी इमारतीच्या प्रांगणात कामबंद आंदोलन देखील केले होते. या प्रकाराबाबत कर्मचाऱ्यांनी तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. तसेच तत्कालीन सीईओ कौस्तुभ दिवेगावकर यांनी आंदोलनकर्त्या कर्मचार्यांसोबत चर्चा केली होती.