मुक्ताईनगर प्रतिनिधी । येथील राष्ट्रवादी पुरस्कृत बंडखोर उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी रोहिणी खडसे यांचा पराभव केल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.
मुक्ताईनगरात एकनाथराव खडसे यांचे तिकिट कापून त्यांची कन्या रोहिणीताई खडसे यांना तिकिट जाहीर केले होते. येथून नाथाभाऊंचे कट्टर विरोधक चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना जिल्हा प्रमुखपदाचा राजीनामा देऊन अपक्ष उमेदवारी केली. शेवटच्या क्षणाला राष्ट्रवादीने त्यांना पुरस्कृत केले. या दोन्ही उमेदवारांनी जोरात ताकद लाऊन प्रचार केला. यामुळे ही लढत अतिशय चुरशीची झाली. अगदी पहिल्या फेरीपासून कधी पाटील तर कधी खडसे यांना आघाडी मिळाली. दरम्यान, आता एक फेरी बाकी असतांना चंद्रकांत पाटील यांना पाचशे मतांची आघाडी मिळाली होती. तर शेवटच्या फेरीत चंद्रकांत पाटील यांनी जोरदार मुसंडी मारली. यामुळे त्यांना २३२९ मतांची निर्णायक आघाडी मिळाली असून त्यांचा विजय निश्चित झालेला आहे. हा जिल्ह्यातील सर्वात धक्कादायक निकाल मानला जात आहे.