मुक्ताईनगर, प्रतिनिधी | शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी पदाचा पक्षश्रेष्ठींकडे राजीनामा दिला आहे. त्यांनी येथून अपक्ष उमेदवारी दाखल केली असून महायुतीच्या अधिकृत उमेदवार रोहिणी खडसे यांना पाठींबा न दिल्याने त्यांनी आपले पद सोडले आहे.
चंद्रकांत पाटील या मतदार संघातून उमेदवारी करण्यासाठी इच्छुक होते. त्यांनी तशी अपेक्षा वेळोवेळी जाहीर केली होती. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांना त्यांचा उघड विरोध होता. गेल्या लोकसभा निवडणुकीवेळीही त्यांनी खडसे यांच्या स्नुषा खासदार रक्षाताई यांचा प्रचार करण्यास नकार दिला होता. नंतर पक्षाने आदेश दिल्यावर त्यांनी विरोध केला नसला तरी प्रचारात सक्रीयताही घेतली नव्हती. त्यामुळे त्यांची पक्षाबद्दलची वेगळ्या अर्थाने असलेली नाराजी उघड दिसत होती. त्याच्याच परिणामी त्यांनी बंडखोरी करीत आता विधानसभेसाठी अपक्ष उमेदवारी केली असून आता पक्षाचा राजीनामा दिला आहे.