चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ट्रिपल महाराष्ट्र केसरी तथा सध्या पुण्यात सहायक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत असणारे चाळीसगाव तालुक्याचे सुपुत्र महाबली विजय चौधरी Triple Maharashtra Kesri Vijay Chaudhari यांनी कॅनडात सुरू असलेल्या वर्ल्ड पोलीस अँड फायर गेममध्ये सुर्वणपदक पटकावून देशासह आपल्या तालुक्याचा देखील नावलौकीक उंचावला आहे.
कॅनडातील विनीपीग शहरात २८ जुलैपासून जागतिक पोलीस आणि फायर स्पर्धा सुरू झालेली आहे. नावातच नमूद केल्यानुसार जगातल्या विविध देशांमधील पोलीस तसेच अन्य सुरक्षा दलांमध्ये कार्यरत खेळाडू यात सहभागी झाले आहेत. यात चाळीसगाव तालुक्यातील सायगाव बगळी येथील मूळ निवासी तथा सध्या पुण्यातील लाचलुचपत प्रतिबंधक ( अँटी करप्शन ) खात्याचे सहायक आयुक्त विजय नथु चौधरी हे देखील १२५ किलोग्राम वजनाच्या सुपर हेवीवेट गटातील कुस्ती स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करत आहेत. हिंद केसरी रोहित पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कसून सराव केला असून यानंतर ते कॅनडातील वर्ल्ड पोलीस अँड फायर गेममध्ये सहभागी झाले.
विजय चौधरी यांनी २०१४, २०१५ आणि २०१६ अशा लागोपाठ तीन वर्षांमधील महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकून अनोख्या विक्रमाची नोंद केलेली आहे. या कामगिरीची दखल घेऊन त्यांना पोलीस खात्यात थेट डीवायएसपी पदी नियुक्ती मिळाली असून आता बढती मिळत ते एसीपी झालेले आहेत. सोशल मीडियात त्यांना मोठी फॅन फॉलोविंग आहे हे विशेष !
दरम्यान, कॅनडातील विनीपेग शहरात सुरू असलेल्या वर्ल्ड पोलीस अँड फायर स्पर्धेत विजय चौधरी यांनी आज पहाटे भारतीय वेळेनुसार साडे तीन वाजेच्या सुमारास सुवर्णपदक पटकावले. अंतीम फेरीस जेसी साहोटा या मल्लास चीत करून त्यांनी विजेतेपद संपादन केले.
दरम्यान, या संदर्भात लाईव्ह ट्रेंडस न्यूजच्या प्रतिनिधीने विजयजींचे वडिल नथू चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. विजय चौधरी यांनी सुवर्णपदक जिंकल्याचे माहित पडताच सायगाव बगळीच नव्हे तर संपुर्ण तालुक्यातून आनंद साजरा करण्यात येत आहे. सोशल मीडियातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.