चाळीसगाव प्रतिनिधी | तालुक्यातील लोंढे येथील दोन जणांच्या शेतातून सहा गायी चोरीला गेल्या असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वृत्त असे की, बापू पितांबर भोसले (वय- ३५) रा. लोंढे ता. चाळीसगाव हे वरील ठिकाणी वास्तव्यास असून लोंढे शिवारातील चिंचगव्हाण रोडवरील शेताच्या बांधावरील शेडमध्ये त्यांच्या मालकीचे गुरेढोरे हे बांधलेले असतात. दरम्यान भोसले हे मंगळवार,२७ रोजी सायंकाळी ७ वाजता गुरांना चारा पाणी करून झोपण्यासाठी घरी निघून गेले. सकाळी ६ वाजता भोसले हे शेतात आले असता. शेडमध्ये बांधलेल्या ३ गायी व १ गोरा दिसून आले नाही. त्यावर त्यांनी परिसरात शोधाशोध केली असता शेजारील सतीश प्रकाश भोसले (रा. लोंढे ता. चाळीसगाव) यांच्याही मुळ मालकीच्या दोन गायी अज्ञाताने चोरून नेल्याचे दिसून आले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. १ लाख ४८ हजार रुपये किंमतीच्या पाच गायी व एक गोर्हा अज्ञात इसमाने चोरून नेल्याने भोसले कुटुंबाचे संसार उघड्यावर आले आहे.
आजपावेतो त्यांनी शोधाशोध केल्यानंतरही गायी मिळून न आल्याने बापू पितांबर भोसले यांच्या फिर्यादीवरून मेहूणबारे पोलिस स्थानकात भादंवि कलम- ३७९ प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. पोलिस निरीक्षक पवन देसले यांच्या निर्देशानुसार पुढील तपास दिपक नरवाडे हे करीत आहेत.