

चाळीसगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. तरवाडे बुद्रुक गावातून शाळेतून घरी परतत असताना रहस्यमयरित्या बेपत्ता झालेल्या ९ वर्षीय धनश्री उमेश शिंदे हिचा मृतदेह तब्बल चार दिवसांनी गावाशेजारील एका विहिरीत आढळून आला आहे. ६० ते ७० तास चाललेल्या या शोधमोहिमेचा शेवट अत्यंत दुर्दैवी झाल्याने संपूर्ण तरवाडे बुद्रुक गाव शोकसागरात बुडाले आहे.
धनश्री शिंदे ही गावातील जिल्हा परिषद शाळेत चौथ्या वर्गात शिक्षण घेत होती. शुक्रवारी १२ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता शाळेत गेलेली धनश्री सायंकाळी घरी न परतल्याने तिच्या कुटुंबीयांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली होती. ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सायंकाळी ४ वाजून ५५ मिनिटांनी ती ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाजूने जाताना दिसली होती. मात्र, त्यानंतर तिचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही.
धनश्रीचा कसून शोध घेत असताना, गावाबाहेरील शेत रस्त्यावर तिचे शालेय दप्तर आढळून आले होते. त्यामुळे कुटुंब आणि गावकऱ्यांनी मुलीचे अपहरण झाले असावे, असा तीव्र संशय व्यक्त केला होता आणि चाळीसगाव तालुका पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हाही दाखल करण्यात आला होता.
अपहरणाचा संशय बळावत असतानाच, सोमवारी १५ डिसेंबर रोजी गावालगतच्या शिवारातील एका विहिरीत धनश्रीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीने तरवाडे बुद्रुक येथे दाखल झाले. विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले.
मृत्यूचे नेमके कारण काय आहे? हा अपघात आहे की घातपात? अपहरणकर्त्यांनीच तिला विहिरीत फेकले आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी एलसीबी आणि पोलीस प्रशासनाकडून सखोल तपास करण्यात येत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे धनश्रीच्या कुटुंबीयांचा आक्रोश अनावर झाला आहे.



