चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील आ. बं. कन्या विद्यालयाच्या सन ९७-९८ या वर्षात शिकलेल्या विद्यार्थीनींचे स्नेहसंमेलन नुकतेच उत्साहात पार पडले.
चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी संचलित आ. बं. गर्ल्स हायस्कूलच्या सन १९९७- १९९८ च्या इयत्ता दहावीच्या वर्गातील माजी विद्यार्थिनींचे स्नेहसंमेलन अर्थातच मैत्री पर्व २०२३ रविवारी १४ मे रोजी आ. बं. गर्ल्स हायस्कूल येथे मोठ्या उत्साहात पार पडले.
स्नेहसंमेलनाची सुरुवात पारंपारिक शालेय प्रार्थनेने करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर आनंदीबाई बंकट गर्ल्स हायस्कूलचे चेअरमन एडवोकेट प्रदीप अहिरराव, ज्येष्ठ संचालक मु. रा. अमृतकार, माजी मुख्याध्यापक यु. बी. काळे, विश्वास देशपांडे, अलका शहा, सुलोचना इंगळे, सेवानिवृत्त शिक्षक रमेश जानराव, सेवानिवृत्त शिक्षिका सुनंदा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत दीप्ती पाटील, तिलोत्तमा पाटील, दिपाली कोतकर, रीता जाजू, मोनाली देसले, दीप्ती कुलकर्णी, स्वाती शेलार, चारुशीला देशपांडे या माजी विद्यार्थिनींनी केले.
या प्रसंगी सेवानिवृत्त शिक्षक तथा ज्येष्ठ संचालक अमृतकर यांनी उपस्थित माजी विद्यार्थिनींच्या उत्कृष्ट आयोजनाचे कौतुक केले. विद्यार्थी हेच आमचे धन, संपत्ती, ऐश्वर्या, मान- सन्मान असतो. आज तुम्ही सर्व समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात चांगल्या हुद्द्यावर कार्यरत असल्याने हाच आमचा खरा अभिमान आहे. अशा भावना त्यांनी याप्रसंगी व्यक्त केल्या. शाळेचे माजी मुख्याध्यापक यु. बी. काळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, आपल्या भेटीने आमचे आयुष्य वाढले आहे. समाजातील विविध क्षेत्रातील आपले स्थान हीच आमची खरी पावती आहे. कन्या शाळेचे चेअरमन एडवोकेट प्रदीप अहिरराव यांनीही सध्याच्या आधुनिक शिक्षण पद्धतीशी शालेय व्यवस्थापन कशाप्रकारे विद्यार्थ्यांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देत आहे याबाबत संस्थेने केलेल्या कार्याची माहिती सांगितली. माजी मुख्याध्यापक विश्वास देशपांडे, अलका शहा, सेवानिवृत्त माजी शिक्षिका सुनंदा पाटील यांनीही आपल्या भावना मनोगतातून व्यक्त केल्या.
उपस्थित सर्व विद्यार्थिनींना रामकृष्ण विवेकानंद सेवा संस्था चाळीसगाव तर्फे भगिनी निवेदिता, स्वामी विवेकानंद यांचे पुस्तक व फोटो भेट देण्यात आले. तर माजी विद्यार्थिनींकडून कन्या शाळेच्या वाचनालयासाठी काही पुस्तके भेट देण्यात आली. कार्यक्रम प्रसंगी अमेरिकेतील सॉफ्टवेअर इंजिनियर जयश्री पाटील हिने अमेरिकेतून व्हिडिओ कॉन्फरन्सने संपर्क साधून आपल्या सदिच्छा व भावना व्यक्त केल्यात. विद्यार्थिनींच्या वतीने चारुशीला देशपांडे व तिलोत्तमा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले तब्बल २५ वर्षांनी वेगवेगळ्या शहरातून मैत्री पर्वासाठी एकत्र आलेल्या वर्गमैत्रीणी या कार्यक्रमात भारावून गेल्याचे दिसून आले.
या कार्यक्रमाचे आयोजन तिलोत्तमा पाटील, रीता जाजू, मोनाली चव्हाण, दिपाली कोतकर, दीप्ती कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. सुजाता चव्हाण यांनी तर आभार दीप्ती पाटील यांनी मानले.