गुटखा प्रकरणातील तीन संशयित अद्याप फरारच !

चाळीसगाव प्रतिनिधी । नुकत्याच जप्त करण्यात आलेल्या गुटख्याच्या प्रकरणात संबंधीत पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यात आली असली तरी या प्रकरणातील तीन संशयित अद्याप फरारच असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

आमदार मंगेश चव्हाण यांनी सिनेस्टाईल पाठलाग करून ५७ लाखांचा गुटखा नेणारा ट्रक पोलिसांना पकडून दिला होता. विशेष म्हणजे मेहुणबारे पोलिसांनी हा ट्रक सोडून दिल्याचे उघड झाले असून या प्रकरणी मेहुणबारेचे एपीआयसह संबंधीत पोलिसांचे निलंबन झाले आहे. तर याच प्रकरणात एलसीबीचे निरिक्षक बापू रोहम यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आलेली आहे.

दरम्यान, एकीकडे निलंबनाची कारवाई होत असतांना या प्रकरणातील तीन संशयित अद्याप फरारच आहेत. या प्रकरणात ट्रकचालक व क्लिनरसह येथील गुटखा विक्रेता विजय देवरे या तिघांना पोलिसांनी अटक केली होती. तर विशाल कारडा, दोंडाईचा येथील शंकर खत्री व मालेगाव येथील बंडू मोरे हे तिघे संशयित फरार आहेत. पोलीस त्यांचा कसून तपास करत असल्याचे सांगण्यात येत असले तरी यातील एक हा राजकीय पक्षाचा पदाधिकारी असल्याने पोलिसांवर दबाव टाकण्यात येत असल्याची चर्चा देखील रंगली आहे.

Protected Content