चाळीसगाव प्रतिनिधी । घरातून शौचासाठी बाहेर गेलेल्या एका २५ वर्षीय विवाहितेचा विहीरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना तालुक्यातील पातोंडा येथे घडली असून याप्रकरणी शहर पोलिसात रात्री उशिराने फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, श्रावण फकीरा पांचाळ (सोनवणे) हे पातोंडा येथे पत्नी, मुले, सुना व नातवंडांसोबत वास्तव्यास आहेत. श्रावण पांचाळ हे हातमजुरी करून आपले उदरनिर्वाह करीत असतात. मोठा मुलगा सुरेश याचा विवाह झालेला असून त्यांची पत्नी सोनम पांचाळ ही ३ मे रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास शौचासाठी घराबाहेर गेली होती. बराच वेळ झाली तरी ती घरी परतली नाही तेव्हा घरच्यांनी परिसरात शोधाशोध केली. अखेर दुपारी तीनच्या सुमारास गावालगत असलेल्या पंडीत नरहर वाणी यांच्या विहीरीत सोनमचा मृतदेह आढळून आला.
या अनुषंगाने चाळीसगाव शहर पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. यात फिर्यादीत नमूद प्रमाणे सोनम ही नेहमी ताण-तणावात असायची. गेल्या वर्षी तिने अतिप्रमाणात गोळ्या सेवन करून आत्महत्या करण्याचे प्रयत्न केले होते. सुदैवाने चाळीसगाव येथील खासगी हॉस्पिटलमध्ये वेळीच औषधोपचार झाल्याने सुदैवाने ती वाचली होती. यानंतर तिचा मृतदेह विहरीत आढळून आल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.
या घटने प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसांत रात्री उशिराने भादंवि कलम- १७४ प्रमाणे फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सहायक फौजदार धर्मराज पाटील हे करीत आहेत.