चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकाच्या पथकाने अतिशय थरारक आणि अगदी सिनेस्टाईल पाठलाग करून गुटख्याने गच्च भरलेला कंटेनर पकडला असून यातून ८२ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.
या संदर्भात पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार,चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पथक तपासकामी मालेगाव रोड येथे गेलेले असतांना मालेगाव रोडवरील बेलगंगा कारखान्याजवळ एक कन्टेनर क्र. एचआर-३८-एबी-६०९६ संशयीतरीत्या भरधाव वेगाने जात असल्याचे या पथकाला दिसले. यामुळे सदर पथकाने कंटेनरला थांबविले असता कंटेनर न थांबता वेगाने पुढे निघून गेले.
दरम्यान, या पथकाने कंटेनरचा पाठलाग करुन मालेगाव येथे मुंबई-आग्रा हायवेवरील चाळीसगाव फाट्यावर सदरचा कंटेनर थांबविला असता गाडीतील मालाबाबत चालकास विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. या कन्टेनरची पाहणी केली असतांना कन्टेनरला लॉक लावलेले होते. चाळीसगाव ग्रामीण पोलीसांनी कन्टेनर व चालकास पोलीस स्टेशनला आणून पोलीस स्टेशनला शासकीय पंचांना पाचारण करुन कन्टेनरचे लॉक उघडून पाहणी केली. त्यात एकूण १३० प्लास्टीक बारदानात एकूण किंमत ८२,२५,१००/- रुपये किंमतीचा गुटखा मिळून आला. यामुळे सदरचा गुटखा व २०,००,०००/- रुपयांचे कन्टेनर असा एकूण १,०२,२५,१००/- रु. किमतीचा माल पंचांसमक्ष जप्त करण्यात आला असून कंटेनरचालकास ताब्यात घेण्यात आले आहे.
ही कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, सपोनि/रमेश चव्हाण, सपोनि/धरमसिंग सुंदरडे, पोलीस उपनिरीक्षक लोकेश पवार, पोना नितीन किसन आमोदकर, गोवर्धन राजेंद्र बोरसे, शांताराम सिताराम पवार, प्रेमसिंग राठोड यांच्या पथकाने केली आहे. पोना नितीन किसन आमोदकर, यांनी दिलेल्या फिर्यादवरुन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांचे मार्गदर्शनानुसार पोलीस उप निरीक्षक लोकेश पवार हे करीत आहेत.