सेवानिवृत्त जवानाचे गावकर्‍यांनी केले स्वागत

चाळीसगाव प्रतिनिधी| तालुक्यातील पाटणा येथील संजय राठोड हे नुकतेच भारतीय सैन्य दलातून निवृत्त झाल्यानिमित्त बंजारा क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष मोरसिंग राठोड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात त्यांचे स्वागत करण्यात आले.

तालुक्यातील पाटणा येथील संजय राठोड हे १७ वर्षाच्या प्रदिर्घ काळानंतर भारत मातेच्या शेवेतून नुकतेच ३१ जूलै २०२१ रोजी भारतीय सैन्य दलातून निवृत्त झाले आहेत. सन २००४ मध्ये ते भारतीय सैन्य दलात भरती झाले होते. दरम्यान देशसेवा करीत असताना त्यांनी घेतलेले अनुभव हे कथनाद्वारे सांगता यावे यासाठी सेवानिवृत्तीचा कार्यक्रम भारतीय बंजारा क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष मोरसिंग राठोड यांच्या अध्यक्षतेखाली पाटणा येथे आयोजित करण्यात आला होता.

याप्रसंगी मनोगत व्यक्त करतांना संजय राठोड म्हणाले की, आजची भावी पिढी ही समाज माध्यमातच अडकून पडलेली आहेत. समाज माध्यमांतच अडकून न राहता देशसेवेसाठी सैन्य दलात बंजारा समाजाचे तरूण वर्ग हे मोठ्या संख्येने भरती व्हायला हवे. कारण आजही बंजारा समाज हा अतिशय दुर्गम भागात आहे. परिणामी अनेकांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे ही वेळ दूर करण्यासाठी बंजारा समाजाने एका छताखाली येणे गरजेचे आहे. असे आवाहन निवृत्त जवान संजय राठोड यांनी केले.

यावेळी भारतीय बंजारा क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष मोरसिंग राठोड हे बोलताना सैन्य दलातून निवृत्त झालेल्या जवानाच्या समारोह कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मला भूषविता आले. हेच माझ्यासाठी भाग्य आहे. त्यामुळे समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी मी शंभर टक्के प्रयत्न करणार असल्याचे ग्वाही त्यांनी यावेळी दिली. कार्यक्रमाप्रसंगी भारतीय बंजारा क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष मोरसिंग राठोड, सरपंच नितीन पाटील (पाटणा), विनोद जाधव, उपसरपंच गोरख राठोड ( शिंदी), पाटणा ग्रामपंचायतीचे सदस्य व मोठ्या संख्येने तरूण वर्ग उपस्थित होता.

Protected Content