चाळीसगाव प्रतिनिधी । पर्यावरणातील प्रत्येक सजीव घटकाचे संवर्धन करणे ही आपली एक सामाजिक जबाबदारी व आद्यकर्तव्य आहे. म्हणून जनजागृती म्हणून आपण प्रत्येकाने सहभागी होऊन अथवा पर्यावरणासाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थामध्ये सहभागी होऊन आपले कर्तव्य पार पाडल्यास पर्यावरणाचे संरक्षण होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केले.
ते चाळीसगाव येथे क्राईम अॅड करपशन कंट्रोल असोसिएशन व शिक्षण विभाग पंचायत समिती चाळीसगांव यांच्या संयुक्त विद्यमानाने चाळीसगांव येथे “Largest Environment protection A wareness Rally” च्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी क्राईम ॲण्ड करप्शन कंट्रोल असोसिएशनचे दिनेश गुप्ता, गटशिक्षणाधिकारी विलास भोई, संघटनेचे बाबासाहेब कछवा, मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष संजय वाघ, अश्विन खैरनार, औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष गणेश चौधरी, व्यापारी असोसिएशनचे प्रदीप देशमुख, विनोद पवार, तालुका अध्यक्ष संतोष महाले, पर्यावरण मित्र शालिग्राम निकम किमया प्रतिष्ठान, तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक वृंद, सर्व केंद्रप्रमुख व त्यांच्या संघटना, सीनियर कॉलेजचे प्राचार्य एस.आर.जाधव, ज्युनियर कॉलेज प्राचार्य शेखर देशमुख, समाजसेवक कैलास पाटील आदी उपस्थित होते.
रॅलीत तालुक्यातील तब्बल 25 हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले असून रॅलीत आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला एक झाड देण्यात आलेला आहे.प्रत्येक विद्यार्थ्याला सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. पर्यावरण संवर्धन करण्यासाठी व प्रदूषण निर्मूलनाची शपथ या ठिकाणी घेतली गेली. प्रदूषण व त्यामुळे होणारे भिषण परिणाम यावर बोलताना आमदार मंगेश चव्हाण यांनी आकडेवारीसह सांगितले की, संयुक्त राष्ट्रसंघाच्या आकडेवारीनुसार, गेल्या १० वर्षात पृथ्वीच्या तापमानात जेवढी वाढ झाली आहे, त्यापैकी ८५ टक्के तापमानवाढ एकटय़ा कार्बन डाय-ऑक्साइडमुळे झाली आहे. जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी व पर्यावरणाच्या संतुलनासाठी एकूण भूभागापैकी ३३ टक्के क्षेत्र हरित आच्छादनाखाली म्हणजेच वनांखाली असणे आवश्यक मानले जाते. मात्र, प्रत्यक्षात हे प्रमाण राखण्याऐवजी दिवसेंदिवस यातही घटच होत आहे. गेल्या २५ वर्षात भारताच्या बाबतीत विचार करता, भारतामध्ये १९८० ते २००५ या कालावधीत १ लाख, ६४ हजार ६१० हेक्टर जंगलांचे खाणींमध्ये रूपांतर झाले आहे. ‘भारतीय वन सर्वेक्षण संस्थे’च्या नोंदीनुसार, २००९ ते २०११ या कालावधीत देशात एकंदर ३६७ चौरस किमी जंगलांचा नाश झाला आहे. भारतातील नैसर्गिक जंगले दरवर्षी १.५ ते २.७ टक्के या वेगाने घटत चालली आहेत.
अशा प्रकारे एका बाजूला आपण प्रदूषण वाढवत आहोत, तर दुस-या बाजूला प्रदूषण रोखणारी वने नष्ट करत आहोत. याचे गंभीर परिणामही आता दिसू लागले आहेत. सन २००० पासून जगभरात प्रदूषणामुळे होणा-या मृत्यूमध्ये ३०० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यापैकी ६५ टक्के मृत्यू आशियात होत आहेत. ‘जागतिक आरोग्य संघटने’नुसार जगभरात दरवर्षी ३.२ दशलक्ष मृत्यू प्रदूषणाशी निगडित आजारांनी होत आहेत. शिवाय स्वाईन फ्ल्यूसारखे नवनवीन आजार जगभरात पसरत आहेत. पर्यावरणाचे रक्षण म्हणून प्रत्येकाने वृक्ष लागवड करुन त्याचे संवर्धन करावे व इतरांनाही प्रोत्साहित करावे. पर्यावरण वाचवा! जीवन वाचवा! देश वाचवा! या उक्ती प्रमाणे पर्यावरणाचे संवर्धन ही काळाची गरज झाली असल्याचे त्यांनी सांगितले.