व्यापाऱ्यांना लुटणार्‍या एकाला अटक, इतर दोघे फरार (व्हिडीओ)

chopsa daroda

जळगाव प्रतिनिधी । पिस्तूलाचा धाक दाखवून तिघांनी जणांनी आज पहाटे वेले चहार्डी रस्त्यावर शेळी – मेंढीचा व्यापार करणाऱ्या दोन व्यापाऱ्यांना चहार्डीकडे जात असताना गाडी अडविली. पिस्तूलाचा धाक दाखवित जवळील ३ लाख ६० हजराची रक्कम लुटण्याचा प्रयत्न अज्ञात चोरट्यांकडून करण्यात आला. यात व्यापाऱ्यांकडील सुमारे दहा हजारांची रोख रक्कम व मोबाईल घेऊन चोरटे पसार झाले. याप्रकरणातील एकाला अटक करण्यात यश आले असून अन्य दोघे फरार झाले असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे यांनी पत्रकार परिषेदत सांगितले. चहार्डी येथील राजेश भिल असे दरोडेखोराचे नाव आहे. त्याचे अन्य दोन साथीदार महेंद्र भिल व राहुल भिल याच्या अटक कामी पोलीस पथक रवाना झाली आहेत.

सहा तासांतच गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश
याबाबत माहिती अशी की, ५ रोजी ५.३० वाजेच्या सुमारास दिलीप काशिनाथ धनगर (वय-५०) रा. चहार्डी, कलीम सलीम खाटीक (वय- ३२) रा.हातेड, छोटू बापू धनगर रा. चहार्डी हे हैदराबादहुन शेळया मेंढ्या विकून वेले-चहार्डी रस्त्यावरून महिंद्रा पिकअप (एमएच १८ बीजी ६६८) गाडीने चहार्डी कडे घरी जात असताना चोसाका गेटजवळ चोरट्यानी गाडी अडवून लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यात दिलीप धनगर व कलीम खाटीक यांच्या डोक्याला बंदूक लावून हवेत गोळीबार करण्यात आला. त्यांच्याकडून सुमारे दहा हजार व मोबाइल हिसकावून घेतला. त्यानंतर डिक्कीत असलेले तब्बल ३ लाख ६० हजार रु असलेली बॅग त्यांनी काढुन घेतली. दिलीप धनगर आणि कलीम खाटीक यांनी प्रतिकार केल्यानंतर त्याना सळईने मारहाण करण्यात आली. आरोपीं डिक्कीतील पैश्याची बॅग घेऊन जात असताना दिलीप धनगर, कलीम खाटीक यांनी आरोपींशी झटापटी करीत त्यांच्यावर दगडफेक केली.

व्यापारी व दरोडेखोरांमध्ये झटापटी, 2 व्यापारी जखमी
आरोपींच्या हातातून पैश्यांची बॅग खाली पडून ती कलीम खाटीक यांनी उचलून वेले गावाकडे पळ काढला. त्याचवेळी चालक संतोष जाधव रा. अजनाड हा आरडाओरड करीत वेले येथील गाईंच्या गोठ्यावर माजी उपसरपंच विनोद पाटील, वेले व त्यांचे बंधू लिलाधर पाटील हे गाईचे दूध काढण्यासाठी आले होते. त्यांना ही घटना समजताच त्यांनी लाकडी दंडुके घेत चोरांच्या दिशेने धाव घेतली. हे सर्व पाहिल्या बरोबर दरोडेखोर ज्या दुचाकीवर आलेले होते त्या दुचाकीवर कारखाना वसाहतीवरून पसार झाले. पळ काढत असतांना त्यांच्या हातातील सळई, पिस्तूल (गावठी कट्टा ) चोसाकागेटच्या मागील बाजूस खाली पडला. तो पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

दरोडेखोर व व्यापारी यांच्या झटापटीत व्यापारी दिलीप धनगर याना पायाला तर कलीम खाटीक याला पोटात मार लागल्याने ते जखमी झाले असून चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. गुन्हा घडल्यानंतर जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अप्पर पोलीस अधीक्षक गोरे, चोपडा उपविभागीय अधिकारी सौरभ अग्रवाल, जळगाव स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोनि बी.जी. रोहम, शहर पोलीस ठाण्याचे पोनि विनायक लोकरे, उपनिरीक्षक यादव भदाणे, पो.उपनिरीक्षक रामेश्वर तुरनर, सुधाकर लहारे यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल होत गुन्ह्याचा कसून चौकशी व तपासणी करीत अवघ्या सहा तासात गुन्ह्याचा उलगडा करण्यात आला.

चहार्डी येथून ताब्यात घेतलेल्या संशयित इसमाची विचारपूस करीत असताना त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी राजेश गोरख भिल (वय-२८) रा चहार्डी यास ताब्यात घेतले आहे. तर छोटू धनगर व संतोष जाधव यांची पोलीस कसून चौकशी करीत आहे. इतर दोघे महेंद्र भिल,राहुल भिल रा चहार्डी हे फरार असून त्याना पकडण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहे. याबाबत चोपडा पो.स्टे.ला भाग ५ गुरन ९१/२०१९ भादवी. क ३९४, ३४१, ३२३, भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५, ३/२७ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

” मेलो तरी चालेल पण सोडायच नाही” – दिलीप धनगर, व्यापारी
मी आणि कलीम खाटीक तीन वर्षांपासून दर आठ दिवसात शेळी-मेंढी विकण्यासाठी हैद्राबाद जातो असतो. परंतु यावेळी चोसाका गेटजवळ चहार्डीकडे जात असताना अडवली गेली. समोरून दोन जण माझ्याजवळ येऊन माझ्या पायावर सळईने वार करत माझ्या डोक्याला पिस्तुल लावत पैश्याची मागणी करु लागला. मी लागलीच माझ्याजवळील सात हजार व कलीम खाटीकने तीन हजार रूपये, मोबाईल त्याना दिला. नंतर त्यानी आम्हाला गाडी खाली उतरवत डिक्कीतील पैश्याची बॅग घेऊन पसार होण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मी कलीमला बोललो की “मेलो तरी चालेल पण याना सोडायच नाही” असं सांगत त्यांच्यावर दगड फेक केली आणि 3 लाख 60 हजार रूपये असलेली बॅग हिसकवली आणि चोरटे घटनास्थळावरून पसार झाले. मी अनेक दिवसांपासून रात्री अपरात्री या रस्त्याने प्रवास करत आहे परंतु माझ्यासोबत असे पहिल्यांदा घडले आहे.

Add Comment

Protected Content