सावदा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात साजऱ्या करण्यात येणाऱ्या “सेवा पंधरवडा” उपक्रमाअंतर्गत फैजपूर येथे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी प्रमाणपत्र वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले. २३ सप्टेंबर २०२५ रोजी धनाजी नाना महाविद्यालयाच्या परिसरात आयोजित या विशेष शिबिरात प्रांताधिकारी बाबाराव काकडे यांच्या हस्ते विविध प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमाचे आयोजन प्रांत कार्यालय फैजपूर आणि यावल तहसील कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून फैजपूरचे प्रांताधिकारी बाबाराव काकडे, यावल तालुक्याचे नायब तहसीलदार बी. एम. पवार तसेच त्यांच्या सहकाऱ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे यांनी प्रास्ताविक करत “शासन आपल्या दारी” उपक्रमांतर्गत शैक्षणिक प्रमाणपत्रे थेट महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून त्यांचा वेळ आणि श्रम वाचवले, याबद्दल प्रांताधिकारी व तहसीलदार यांचे आभार मानले.

प्रांताधिकारी काकडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले की, विविध शासकीय प्रमाणपत्रे ही केवळ कागदपत्रे नसून विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या वाटचालीतील अत्यंत महत्त्वाची साधने आहेत. त्यांनी एक उदाहरण देत सांगितले की, काही वर्षांपूर्वी एका विद्यार्थ्याचा प्रवेश फक्त एका प्रमाणपत्राअभावी थांबला होता. त्यावेळी त्यांनी स्वतः मध्यरात्री ११ ते १२ दरम्यान तत्काळ ऑनलाइन मंजुरी देत दाखला उपलब्ध करून दिला. त्यांनी अशा अनेक अनुभवांतून उपस्थितांना प्रेरणा देत शासनाच्या तत्परतेवर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले.
तसेच, त्यांनी विद्यार्थ्यांना आयुष्यात मोठे यश मिळवण्यासाठी केवळ पाठ्यपुस्तकापुरते न राहता, अवांतर वाचनावर भर देण्याचे आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी सतत नवे शिकण्याचे महत्त्व पटवून दिले.
या शिबिरात एकूण १३७ प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. यामध्ये ३२ जात प्रमाणपत्रे, ३१ डोमिसाइल (राहिवासी) प्रमाणपत्रे, ४७ उत्पन्नाचे दाखले आणि २७ नॉन-क्रिमिलियर प्रमाणपत्रांचा समावेश होता. याचा थेट लाभ धनाजी नाना कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय व औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना झाला.
कार्यक्रमासाठी नायब तहसीलदार बी. एम. पवार, मंडलाधिकारी श्री. शेलकर, ग्राम महसूल अधिकारी श्रीकांत केंद्रे, उपप्राचार्य डॉ. हरीश नेमाडे तसेच सर्व प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रा. उत्पल चौधरी यांनी केले.
हा उपक्रम विद्यार्थ्यांना केवळ प्रमाणपत्रांच्या स्वरूपात मदत करणारा नसून, प्रशासन व शिक्षण संस्थांमधील समन्वयातून घडणारा एक प्रेरणादायी अनुभव ठरला.



