Home आरोग्य सीईओ मीनल करनवाल यांचा अभिनव निर्णय : वैद्यकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती आता व्हिडिओ...

सीईओ मीनल करनवाल यांचा अभिनव निर्णय : वैद्यकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती आता व्हिडिओ कॉलद्वारे

0
119

जळगाव–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । ग्रामीण भागातील नागरिकांना प्राथमिक आरोग्य सुविधा अखंडितपणे उपलब्ध राहाव्यात, यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक पाऊल उचलले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल यांनी आता थेट व्हिडिओ कॉलद्वारे प्राथमिक आरोग्य केंद्रांवरील वैद्यकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती तपासण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून ग्रामीण भागातील काही प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकारी व इतर आरोग्य कर्मचारी नियमितपणे उपस्थित राहत नसल्याच्या तक्रारी सातत्याने येत होत्या. या तक्रारींमुळे नागरिकांच्या आरोग्य सेवांवर परिणाम होत असल्याचे लक्षात घेत सीईओ करनवाल यांनी ही नवी पद्धत लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयानुसार, आता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वतः दररोज ठराविक वेळेला विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांशी थेट व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधतील. यामधून त्या संबंधित वैद्यकीय अधिकारी प्रत्यक्ष केंद्रावर उपस्थित आहेत का, केंद्रातील आरोग्य सुविधा सुरू आहेत का आणि रुग्णांना वेळेवर सेवा दिली जाते का, याची प्रत्यक्ष खात्री करतील.

हा उपक्रम राबविण्याचा उद्देश म्हणजे आरोग्य यंत्रणेत पारदर्शकता आणि जबाबदारी वाढवणे हा आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या या पुढाकारामुळे आरोग्य यंत्रणेत शिस्तबद्धता निर्माण होईल, तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये जबाबदारीची जाणीव अधिक दृढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ग्रामीण भागातील आरोग्य सेवांची गुणवत्ता आणि उपलब्धता वाढविण्यासाठी हा निर्णय अत्यंत परिणामकारक ठरेल, असे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मत आहे. नागरिकांना दर्जेदार व तत्पर आरोग्य सेवा मिळणे हेच या निर्णयामागील मुख्य उद्दिष्ट असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


Protected Content

Play sound