मुंबई – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसंस्था | “केंद्र सरकारने केलेली पेट्रोलवरील व डिझेलवर कर कपात ही प्रत्यक्षात ही भाजपा नेत्यांनी जनतेच्या डोळ्यात केलेली धुळफेक असून आवळा देऊन कोहळा काढण्याचा प्रकार असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
यापुढे बोलताना त्यांनी “मोदी सरकाला प्रामाणिकपणे जनतेला दिलासा द्यायचा असेल तर २०१४ सालापासून इंधनावर वाढवलेले अन्याकारक कर रद्द करावेत मोदी सरकारने सात वर्षात इंधनावरील करातून तब्बल २७ लाख कोटी कमावले असल्याचे विधान करत गॅस दर ७०० रुपयांनी वाढवून २०० कमी करणे आवळा देऊन कोहळा काढण्याचा प्रकार असल्याचे त्यानी सांगितले. सामान्य जनतेची महागाईच्या गर्तेतून सुटका करायची मोदी सरकारची प्रामाणिक इच्छा असेल तर गॅस सिलिंडर ४०० रुपये करत सबसिडी पूर्ववत करण्याची मागणी पटोले यांनी केली.
नाना पटोले म्हणाले, “मोदी सरकारने पाच महिन्यांपूर्वी पेट्रोल १० रुपये व डिझेल ५ रुपयांनी कमी केले आणि नंतर पाच राज्यातील विधानसभा निवडणुका संपताच पुन्हा दर वाढवून होते तेवढेच दर केले. आता राज्य सरकारने कर कपात करावी अशी मागणी करत राज्यातील भाजपाचे नेते चुकीची व दिशाभूल करणारी विधाने करत असल्याचे त्यांनी सांगितले.
मोदी सरकार इंधनावर रोड डेव्हलपमेंट, कृषी विकास सारखे वेगवेगळे सेस लावून लूट करत असून अबकारी करातील हिस्सा राज्याला मिळतो पण सेसमधला हिस्सा राज्याला मिळत नाही. एक प्रकारे अबकारी कर कमी करून केंद्र सरकार राज्याची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि दुसरीकडे सेस लावून जनतेची लूट करत आहे. ती तात्काळ थांबवली पाहिजे,” अशी मागणी करत केंद्र सरकार राज्याची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.