Home amalner पाडळसरे धरणाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी केंद्राकडून मदतीचे आश्वासन

पाडळसरे धरणाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी केंद्राकडून मदतीचे आश्वासन


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । निम्न तापी प्रकल्पाच्या (पाडळसरे धरण) दुसऱ्या टप्प्यासाठी केंद्र सरकारकडून भरीव मदत मिळेल, असे आश्वासन केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी दिले आहे. आ.अनिल पाटील आणि खा.स्मिताताई वाघ यांनी नवी दिल्ली येथे संसद भवनात नामदार सी. आर. पाटील यांची विशेष भेट घेतली.

या भेटीदरम्यान, आमदार अनिल पाटील आणि खासदार स्मिताताई वाघ यांनी निम्न तापी प्रकल्पाचा समावेश केंद्र सरकारच्या “प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (PMKSY)” मध्ये केल्याबद्दल केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील यांचे मनःपूर्वक आभार मानले. या केंद्रीय योजनेत पहिल्या टप्प्याचा समावेश करून २७०० कोटींपैकी ८५९ कोटी रुपयांचा निधी मिळाल्याने प्रकल्पाला मोठा हातभार लागला असल्याचे त्यांनी नमूद केले. आता दुसऱ्या टप्प्यासाठीही अशीच भरीव मदत मिळावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

नामदार सी. आर. पाटील यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद देत प्रकल्पाच्या कामाला गती मिळावी आणि तो लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी दुसऱ्या टप्प्यासाठीही केंद्र सरकारकडून भरघोस सहाय्य देण्याचे आश्वासन दिले. यावेळी झालेल्या सविस्तर चर्चेत आमदार पाटील यांनी माहिती दिली की, धरणाचा केंद्रीय योजनेत समावेश झाल्यानंतर राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीत पहिल्या टप्प्यातच दुसऱ्या टप्प्यातील अंशतः येणाऱ्या गावांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या प्रकल्पामुळे पहिल्या टप्प्यातच बंद पाईपलाईनद्वारे शेतीला पाणी देण्यात येणार असल्याने जवळपास ८३ हजार एकर जमीन ओलिताखाली येऊन संपूर्ण बागायती होणार आहे. उर्वरित दुसऱ्या टप्प्यातील १८ हजार हेक्टर जमिनीचे सर्वेक्षण करण्याबाबत नियामक मंडळाच्या बैठकीत चर्चा झाली असून, त्यासाठीही केंद्र शासनाची मदत मिळावी अशी अपेक्षा आमदार पाटील आणि खासदार स्मिता वाघ यांनी व्यक्त केली. मंत्री पाटील यांनी लवकरच प्रकल्पाला भेट देण्याची ग्वाही दिली.

या प्रकल्पामुळे धरणाच्या प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस वाढत असून, अमळनेर मतदारसंघासह जळगाव जिल्हा आणि परिसरातील शेतकऱ्यांच्या पाण्याच्या प्रश्नाला मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे शेती आणि ग्रामीण विकासाला नवी दिशा मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


Protected Content

Play sound