Home उद्योग सेंट्रल बँक ऑफ इंडियातर्फे महिलांसाठी विशेष योजना आणि डिजिटल सेवांचा शुभारंभ

सेंट्रल बँक ऑफ इंडियातर्फे महिलांसाठी विशेष योजना आणि डिजिटल सेवांचा शुभारंभ


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भारताच्या आर्थिक इतिहासात महत्त्वाचे स्थान असलेल्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या संस्थापक सर सोराबजी पोचखानवाला यांची १४४ वी जयंती बँकेच्या विविध शाखांमध्ये आणि देशभरात विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. देशातील पहिल्या पूर्णपणे स्वदेशी बँकांच्या अग्रणी ठरलेल्या या संस्थेने या विशेष दिनाचे औचित्य साधून ग्राहक, भागधारक आणि कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आणि बँकेच्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवणाऱ्या नव्या योजनांची घोषणा केली.

जळगाव येथील पत्रकार परिषदेत बँकेचे प्रादेशिक प्रमुख रमेश जठानी यांनी सर पोचखानवाला यांच्या दूरदृष्टीपूर्ण विचारांचे आणि आर्थिक क्षेत्रातील योगदानाचे स्मरण केले. त्यांनी बँकेच्या सामाजिक आणि आर्थिक समावेशकतेविषयी बोलताना ग्राहक कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या विविध योजना सादर केल्या असून त्या सर्वसामान्य नागरिकांसाठी उपयुक्त ठरणार असल्याचे सांगितले.

या जयंतीनिमित्त महिलांसाठी विशेष ‘सेंट गृहलक्ष्मी’ बचत खाते जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये महिलांना व्यवहार सुलभता, सेवा शुल्क सवलत आणि अनेक अतिरिक्त लाभ मिळणार आहेत. तसेच ‘सेंट ज्वेलरी’ हे सोने गुंतवणूक लक्षात घेऊन सादर केलेले विशेष बचत खाते आणि व्यापाऱ्यांसाठी डिजिटल सुविधांनी युक्त ‘सेंट व्यापार’ चालू खाते याही योजना ग्राहकांसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत.

नवीन आर्थिक वर्षात महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणावर भर देत, गृहकर्जासाठी ‘सेंट गृहलक्ष्मी होम लोन’, इलेक्ट्रिक दुचाकीसाठी ‘सेंट ई-डी व्हीलर लोन’ आणि ग्रामीण महिला उद्योजकांसाठी ‘रेड अप इंडिया योजना’ याही कर्ज योजना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. देशभरातील ९० विशेष महिला शाखांमार्फत महिलांना स्वतंत्र व सुरक्षित बँकिंगचा अनुभव मिळणार आहे.

याशिवाय संपत्ती व्यवस्थापनासाठी जीवन विमा, सामान्य विमा, म्युच्युअल फंड, डीमॅट खाते, एसआयपी (SIP) आदी सुविधा एकाच छताखाली देण्यात येत आहेत. MSME आणि वैयक्तिक ग्राहकांसाठी रिटेल कर्ज योजना सुलभ करण्यात आल्या असून, विविध गरजेनुसार सुलभ व आकर्षक कर्ज पर्यायही सादर करण्यात आले आहेत.

या विशेष दिवशी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या (RSETI) वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हरित उपक्रमांच्या माध्यमातून बँकेने पर्यावरण संवर्धनाची भूमिकाही अधोरेखित केली आहे.

ग्राहकांना या सर्व योजनांचा लाभ घेता यावा यासाठी अधिक माहिती www.centralbankofindia.co.in या अधिकृत संकेतस्थळावर किंवा 7900123123 या संपर्क क्रमांकावर उपलब्ध असल्याचे बँकेने जाहीर केले आहे.

सर पोचखानवाला यांच्या दूरदृष्टीचा वारसा जपत, सेंट्रल बँक ऑफ इंडिया नेहमीच ग्राहककेंद्रित धोरणांद्वारे आर्थिक समावेशाचा विस्तार करत आहे. यंदाची १४४ वी जयंती बँकेच्या नव्या वाटचालीला दिशा देणारी ठरली आहे.


Protected Content

Play sound