मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नाशिक डहाणू रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणास केंद्राने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पामुळे नाशिक जिल्ह्याला अधिक फायदा होणार आहे. जिल्ह्याला धार्मिक, ऐतिहासिक व कृषी क्षेत्राच्या दृष्टीने विशेष असे महत्त्व आहे. त्यादृष्टीने भारत-मिडल ईस्ट-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर अंतर्गत नाशिक – त्र्यंबकेश्वर – वाणगाव वाढवण पोर्ट बीजी रेल्वेला मंजुरी देण्याची मागणी होत होती. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना १८ जून २०२४ रोजी पत्रव्यवहार करून ही मागणी केली होती. तसेच याबाबत भुजबळ यांचा सातत्याने पाठपुरावा देखील सुरू होता. त्याला अखेर यश आले आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी वाढवण बंदराला राज्य आणि केंद्र शासनाच्या वतीने मंजुरी देण्यात आली होती. या बंदराचे नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन व कोनशिला अनावरण करण्यात आले. या बंदराला जोडण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने नाशिक-डहाणू रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी मंजुरी देण्यात आली आहे. नाशिक ते डहाणू रेल्वेमार्गाच्या १०० किलोमीटरच्या या लाईनमुळे दोन महत्त्वाच्या ठिकाणांची कनेक्टिव्हिटीत मोठी वाढ होणार आहे. तसेच आर्थिकदृष्ट्या देखील हा प्रकल्प अतिशय फायदेशीर ठरणार आहे. विशेष म्हणजे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर आणि पंचवटीसारख्या धार्मिक महत्त्व असलेल्या ठिकाणांना या रेल्वे मार्गामुळे सहज पोहचता येणे शक्य होणार असून प्रवासाचा वेळ देखील वाचणार आहे.