अमळनेर (प्रतिनिधी) सानेगुरुजी एक विलक्षण गृहस्थ होते. अफाट काम करण्याची शक्ती त्यांच्यात होती. गुरुजींच्या जीवनाकडे बघितले की, त्यांच्याकडे एवढे प्रचंड शक्ती कशी होती, याचे आश्चर्य वाटते. तुरुंगवास, दौरे, व्याख्याने, उपवास, रुग्णसेवा या धकाधकीच्या जीवनात त्यांनी एवढी वाड:मय संपदा कशी निर्माण केली असावी, अनेक लोकांना प्रेरणा देऊन कसे कार्यप्रवृत्त केले, हे एक न उलगडलेले कोडे आहे. असे प्रतिपादन दिलीप सोनवणे यांनी आज (दि.११) येथे पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाच्या वतीने आयोजित साने गुरुजी पुण्यतिथी कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणातून केले.
व्यासपीठावर विश्वस्त बापू नगावकर, संयुक्त चिटणीस सुमित कुलकर्णी व सदस्य अँड रामकृष्ण उपासनी, ईश्वर महाजन, दीपक वाल्हे, प्रसाद जोशी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे यांनी साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन केले तर ज्येष्ठ विश्वस्त बापू नगावकर यांनी प्रतिमेला माल्यार्पण केले.यावेळी वाचक शशिकांत पाटील, अविनाश जाधव, कर्मचारी सीमा धाडकर, सुरेश जोशी, रमेश सोनार व वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाचनालयाचे सदस्य ईश्वर महाजन यांनी तर आभार प्रदर्शन दिपक वाल्हे यांनी केले.