शिवजयंती उत्सव सुरक्षिततेने साजरा करा; महावितरणचे आवाहन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शिवजयंती उत्सव साजरा करताना वीज यंत्रणेपासून सुरक्षित अंतर राखा आणि सावधगिरी बाळगा. विद्युत सुरक्षिततेचे नियम पाळावेत, असे आवाहन जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. आय.ए. मुलाणी यांनी केले आहे.

शहरांसह गावांंमध्ये महावितरणच्या उच्च व लघु दाबाच्या विद्युत वाहिन्या, मिनी पिलर, वीजखांब उभारलेले आहेत. अशा ठिकाणी विद्युत वाहिन्यांच्या खाली किंवा विद्युत यंत्रणेजवळ कार्यक्रम, रॅली, देखावे, फ्लेक्स, छायाचित्रे किंवा मूर्ती उभारण्यात येऊ नये. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आणि आनंदाच्या उत्सवात विद्युत अपघाताचे विघ्न येऊ नये, यासाठी सुरक्षितता व सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

जयंतीनिमित्त कार्यक्रमस्थळी संभाव्य धोके टाळण्यासाठी वीज यंत्रणेची योग्य काळजी घेण्यात यावी:
ज्या ठिकाणी उत्सव साजरा करण्यात येणार आहे, तेथे महावितरणकडून तात्पुरती अधिकृत वीज जोडणी घ्यावी. विद्युत वाहिनी उंचीनुसार सुरक्षित अंतरावर फ्लेक्स, बोर्ड, ध्वज लावण्यात यावे, जेणेकरून विद्युत वाहिनीला किंवा यंत्रणेला स्पर्श होणार नाही. रोषणाईसाठी विद्युत व्यवस्था व मांडणी अधिकृत विद्युत कंत्राटदारांकडूनच करून घ्यावी. विद्युत रोषणाईसाठी सार्वजनिक ठिकाणी लावलेल्या वायर खाली झुकलेल्या किंवा विस्कळीत झालेल्या नाहीत, याची तपासणी करावी. जोड द्यायचा असल्यास योग्य क्षमतेच्या इन्सुलेशन टेपचा वापर करावा. उत्सव काळात शॉर्टसर्किट होणे, विद्युत वायरिंगमध्ये बिघाड होणे आदी कारणांमुळे संभाव्य धोके टाळण्यासाठी संबंधित क्षेत्रातील महावितरणचे अभियंता व कर्मचारी यांचे भ्रमणध्वनी क्रमांक नोंदवून ठेवावेत, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Protected Content