नवी दिल्ली वृत्तसंस्था । आयसीआयसीआय बँकेने बेकायदेशीर मार्गाने कर्ज दिल्याप्रकरणी उद्योजक वेणूगोपाल धूत आणि दीपक कोचर यांच्या कार्यालयांवर आज सीबीआयने छापे मारले आहेत.
आयसीआयसीआय बँकेने व्हिडिओकॉन कंपनीला बेकायदेशीर पध्दतीत कर्ज दिले आहे. दीपक कोचर यांना व्हिडिओकॉनने सहाय्य करावं यासाठी हे कर्ज देण्यात आले असा आरोप आहे. वेणूगोपाल धूत यांच्या व्हिडिओकॉन समूहाला एकूण २० बँकांच्या समूहाने ३२५० कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. यात आयसीआयसीआय बँकेचा वाटा १० टक्के इतका होता. त्यावेळी चंदा कोचर या आयसीआयसीआय बँकेच्या प्रमुखपदी होत्या. कर्जाच्या बदल्यात धूत यांनी दीपक कोचर यांच्या नूपॉवर कंपनीत ६४ कोटी रुपयांची गुंतवणूक केली. यात दीपक कोचर यांची ५० टक्क्यांची भागीदारी होती असा आरोप एका सहभागधारकाने केला होता. याच आरोपांमुळे चंदा कोचर यांना आयसीआयसीआय बँकेच्या प्रमुखपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर आज सीबीआयने धूत व कोचर यांच्या कार्यालयांवर छापे टाकून कसून चौकशी सुरू केली आहे.