पारोळा प्रतिनिधी । शहरात सीबीआयच्या पथकाने धाड टाकून कर्ज प्रकरणासाठी लाच मागणार्या बँक मॅनेजरला एका हस्तकासह अटक केल्याने खळबळ उडाली आहे.
शहरातील बँक ऑफ बडोदावर आज दुपारी धाड टाकण्यात आली. यात बँक मॅनेजरसह त्याच्या एका कर्मचारी नसणार्या सहकार्याला अटक करण्यात आली आहे. तालुक्यातील एका तक्रारदाराने बँक ऑफ बडोदामध्ये कर्ज प्रकरणे सादर केली होती. ही प्रकरणे मंजूर करण्यासाठी व्यवस्थापक किरण ठाकरे याने आपला पंटर नरेंद्र गणेश पाटीलच्या माध्यमातून ७५ हजरांची लाच मागितली होती.
दरम्यान, संबंधीत व्यक्तीने याबाबत थेट सीबीआयकडे तक्रार केली होती. याची दखल घेऊन सीबीआयच्या पथकाने सापळा रचून किरण ठाकरे आणि नरेंद्र पाटील यांना रंगेहात अटक केली असून दोघांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. थेट सीबीआयने केलेल्या कारवाईमुळे शहरासह परिसरात खळबळ उडाली आहे.