गौरव पार्क येथील बंद घर फोडून रोकड लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरातील गौरव पार्क येथे बंद घर फोडून घरातून २० हजारांची रोकड लांबविल्याची घटना १३ नोव्हेंबर रोजी उघडकीला आली आहे. घरमालक घरी आल्यानंतर त्यांनी रामानंद नगर पोलीसात फिर्याद दिली. त्यानुसार सोमवारी २० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, गणपत व्यंकटराव धुमाळे (वय-४२) रा. गौरव पार्क, पिंप्राळा, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. दिवाळी निमित्त गणपत धुमाळे हे आपल्या परिवारासह मुळगावी लोणी ता. देगलूर जि.नांदेड येथे १० नोव्हेंबर रोजी घराला कुलूप लावून गेले होते. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांचे बंद घराचे कूलप तोडून आत प्रवेश करत घरातील टेबलाच्या ड्राव्हरमध्ये ठेवलेले २० हजारांची रोकड चोरून नेली. त्यांच्या शेजारी राहणारे रमेश बोरसे यांना गणपत धुमाळे यांच्या घराचे दरवाजावरील लॉक तुटलेले दिसले. त्यानुसार घरात चोरी झाल्याबाबत धुमाळे यांना कळविले. त्यानंतर धुमाळे हे १९ नोव्हेंबर रोजी घरी आले तेव्हा घरात सर्व सामान पसरलेला दिसून आला. व टेबल्याच्या ड्रॉव्हरमधून २० हजार रूपयांची चोरी झाल्याचे निदर्शनास आले. धुमाळे यांनी सोमवारी २० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content