जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील विठ्ठलवाडी परिसरात एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ३९ हजार २८१ रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विठ्ठलवाडी येथील भागात धवल सुभाष पवार (वय २१) हे शिक्षणासाठी जळगावात वास्तव्यास आहेत. २० जानेवारी रोजी मध्यरात्री २ ते ४ वाजेच्या दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोंडा तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील कपाटातून ५,९०७ रुपये किमतीची चांदीची वाटी, ६ हजार ९१४ रुपयांचे चांदीचे ग्लास, १ हजार ४६० रुपयांचा चांदीचा चमचा आणि २५ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ३९ हजार २८१ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

हा प्रकार लक्षात येताच धवल पवार यांनी २१ जानेवारी रोजी दुपारी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रामकृष्ण वासुदेव इंगळे करत आहेत.



