धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव शहरातील सराय मोहल्ला परिसरातून एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. इराण देशातील एका महिलेला आणि तिच्या तीन वर्षांच्या मुलाला विनापरवानगी आणि व्हिजाची मुदत संपलेली असतानाही आश्रय दिल्याप्रकरणी धरणगाव पोलिसांनी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे.

सविस्तर माहिती अशी की :
धरणगाव येथील कुरेशी मोहल्ल्यात राहणारे संशयित आरोपी कुरेशी शेख रफीक शेख मुसा आणि शेख अहमद रजा शेख मुसा यांनी त्यांच्या घरी फरनाज हमीद रेझा मसाई (रा. तेहरान, इराण) आणि तिचा तीन वर्षांचा मुलगा सुफी अली यांना आश्रय दिला होता. विशेष म्हणजे, या महिलेच्या विजाची मुदत २०२२ मध्येच संपली होती. तरीही, गेल्या एक वर्षापासून या महिलेचे वास्तव्य धरणगावात बेकायदेशीरपणे सुरू होते. यासंदर्भात संशयित आरोपींनी स्थानिक पोलीस ठाण्याला कोणतीही माहिती न देता विदेशी नागरिक कायद्याचे उल्लंघन केले.

अशी झाली कारवाई :
धरणगाव पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, सराय मोहल्ला परिसरात एक विदेशी महिला राहत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी शोध मोहीम राबवून महिलेची चौकशी केली असता, ती इराणची नागरिक असल्याचे निष्पन्न झाले. तिची कागदपत्रे तपासली असता, विजाची मुदत संपून बराच काळ लोटल्याचे समोर आले. एक वर्षापर्यंत ही माहिती लपवून ठेवल्यामुळे भारतीय विदेशी नागरिक कायदा (२०२५ चे कलम २४ आणि ८) नुसार हा गुन्हा मानला गेला.
धरणगाव पोलीसांकडून दोघांना अटक :
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल चंदन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुरुवारी ८ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तातडीने कारवाई करत कुरेशी शेख रफीक आणि शेख अहमद रजा यांना अटक केली आहे. या घटनेमुळे शहरात विविध चर्चांना उधाण आले असून, या महिलेचे भारतात येण्याचे नेमके कारण आणि तिला आश्रय देण्यामागचा उद्देश काय होता, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.



